वांद्रे-कुर्ला संकुलात दर शुक्रवारी साप्ताहिक ‘सार्वजनिक वाहतूक दिन’ पाळला जाणार आहे. या उपक्रमामागचं कारण काय? बीकेसीतील वाढती वाहतूक कोंडी. दररोज लाखो कर्मचारी लोकलने वांद्रेपर्यंत पोहोचतात. पण त्यानंतर स्टेशनपासून कार्यालयांपर्यंत पोहोचताना त्यांची खरी कसरत सुरू होते. खासगी वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतुकीवरील ताण वाढतो. त्यामुळे हा उपक्रम हाती घेतला असला तरी कोंडीची समस्या सुटेल का हा प्रश्न कायम राहतो. त्यासाठी बीकेसीमध्ये ‘पॉड टॅक्सी’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रवाशांचे दररोज हाल
वांद्रे आणि कुर्ला रेल्वे स्थानकावरून लोकल प्रवासी रिक्षाने कार्यालयांपर्यंत पोहोचतात. रिक्षा पकडण्यासाठी पहिलं त्यांना लाबंच-लांब रांगा लावाव्या लागतात. त्यानंतर रिक्षावाल्यांसोबत भाड्यासाठी रोजची भांडणं. हे सर्व करून एकदा रिक्षा मिळाली तरी नंतर ट्राफिकमध्ये तासभर वाया घालवायचा. बीकेसीतील कर्मचाऱ्यांचं हेच आयुष्य. याच समस्येवर उपाय काढण्यासाठी पॉड टॅक्सीचा पर्याय निवडला आहे. पण या पॉड टॅक्सीने खरचं मुंबईकरांना फायदा होईल का सवाल उपस्थित केला जात आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण( MMRDA ) 2028पर्यंत बीकेसीमध्ये देशातील पहिलं पॉड टॅक्सी नेटवर्क सुरू करेल. पॉड टॅक्सीद्वारे एका लहानशा वाहनातून प्रवाशांना त्यांच्या इच्छुक स्थळी पोहोचवलं जाणार आहे. यामुळे मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता आहे. वातानुकूलित गाड्यांमधून वेगवान प्रवास शक्य करण्याचं उद्दिष्ट आहे.
