कुंपणच शेत खातय ही म्हण तुम्ही ऐकली असेल. मात्र ही म्हण जालन्यातील एका प्रकरणाला तंतोतंत लागू आहे. नदीपात्रातून होणारा वाळू उपसा रोखण्यासाठी ज्या तहसीलदारांनी वाळू माफियांवर कारवाई करणे आवश्यक असते त्याच तहसीलदारांना वाळू माफियांकडून लाज घेताना अटक करण्यात आली आहे. वाळू उपसा करणाऱ्या पोकलेन मशीन, हायवा आणि अन्य वाहनांकडे दुर्लक्ष करण्यासाठी जालन्यातील अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांना 6 लाख 40 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने छत्रपती संभाजीनगर मधील सातारा परिसरात शनिवारी रात्री पकडले होते.
जालन्यातील अंबडचा तहसीलदार विजय चव्हाण यांना रविवारी न्यायालयात हजर केल्यानंतर 9 जूनपर्यंत पोलिस कोठडी मंजूर केल्याची माहिती एसीबीने दिली. दरम्यान लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण याच्या संपत्तीची खुली चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
