दागिन्यांच्या मोहाने वृद्ध महिला नातेवाईकाला संपवलं, बॉडी घाटात फेकली; थरारक घटनेनं आंबेनळी घाट पुन्हा चर्चेत

अलिबाग तालुक्यातील सारळ आदिवासीवाडी येथील एका 85 वर्षीय सुनंदा लक्ष्मण पाटील यांच्या बेपत्ता प्रकरणाचा मांडवा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत उलगडा करत दागिन्यांच्या हव्यासापोटी झालेल्या हत्येचं गूढ उकललं आहे. याप्रकरणी महिलेचा नातेवाईक अनदर्श हिराजी शेडगे (वय 32) आणि रितेश नरेश लोहार (वय 20, दोघे रा. तिनविरा, ता. अलिबाग) यांना अटक करण्यात आली असून या घटनेमुळे रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

सुनंदा पाटील या 31 मे 2026 पासून बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी मांडवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सुरुवातीला बेपत्ता प्रकरण म्हणून तपास सुरू असताना चौकशीत हत्येचा संशय बळावला. तपासादरम्यान आरोपींनी दागिने लुटण्याच्या उद्देशाने कट रचून महिलेचं अपहरण केल्याचं उघड झालं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी सुनंदा पाटील यांना सारळ येथून तिनविरा परिसरात नेऊन गळा आवळून हत्या केली. त्यानंतर गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटातील बावली टोक ते दाभिल टोक दरम्यानच्या खोल दरीत फेकून दिला.

तपासादरम्यान पोलिसांनी संशयित अनदर्श शेडगेला ताब्यात घेतलं असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि मृतदेह फेकल्याचं ठिकाण दाखवून दिलं. त्यानंतर अलिबाग पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. घाटातील अत्यंत धोकादायक आणि खोल दरीतून मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम तसेच महाबळेश्वर ट्रेकर्सच्या सदस्यांनी विशेष मोहीम राबवली. जवानांनी जीव धोक्यात घालून दरीत उतरून मृतदेह बाहेर काढला. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी माया मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या गुन्ह्याचा छडा लावला. याप्रकरणी मांडवा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 71/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आंबेनळी घाट गुन्हेगारीचा घाट

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघाताची घटना ताजी असतानाच आता हत्या प्रकरण उघडकीस आल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. यापूर्वीही या घाट परिसरात संशयास्पद मृतदेह आढळल्याच्या घटना घडल्या असल्यानं आंबेनळी घाट पुन्हा एकदा गंभीर गुन्हेगारी घटनेमुळे चर्चेत आला आहे.
पोलिसांकडून मृतदेहाच्या विल्हेवाटीचा संपूर्ण घटनाक्रम, चोरीस गेलेल्या दागिन्यांचा तपास आणि गुन्ह्यातील अन्य बाबींचा सखोल तपास सुरू आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *