गर्भलिंग’ रॅकेटमागे एकच सूत्रधार; तीन जिल्ह्यांतील कारवायांत नरेंद्र ठाकरेचे नाव समोर

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता, पुणे जिल्ह्यातील शिरूर-वाघोली आणि नुकत्याच उघडकीस आलेल्या यवत येथील गर्भलिंग निदान प्रकरणांमध्ये एक समान धागा समोर येत असून, तिन्ही प्रकरणांमध्ये नरेंद्र साहेबराव ठाकरे याचे नाव एजंट म्हणून पुढे आले आहे. त्यामुळे उघडकीस आलेल्या गर्भलिंग निदानाच्या साखळीमागील प्रमुख सूत्रधार तोच असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मार्च २०२६ मध्ये वाघोली पोलिसांच्या कारवाईत अटक झालेला ठाकरे, राहाता तालुक्यातील मोबाइल गर्भलिंग निदान रॅकेटमध्ये एजंट म्हणून समोर आलेले धागेदोरे आणि यवत प्रकरणातील पोर्टेबल सोनोग्राफी मशीनचा पुरवठादार म्हणून ठाकरेचे नाव पुढे आले आहे.

वाघोली पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह?
मार्च २०२६ मध्ये गुन्हे शाखेने डोकसावंगी येथे छापा टाकून नरेंद्र ठाकरेला अटक केली होती. त्या वेळी त्याच्याकडून जप्त साहित्य, त्याचे संपर्क, आर्थिक व्यवहार, पोर्टेबल सोनोग्राफी यंत्रांचा पुरवठा आणि इतर जिल्ह्यांतील नेटवर्क यांची सखोल चौकशी झाली का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. यवत प्रकरणात समोर आलेल्या माहितीनुसार ठाकरेचे नाव पुन्हा पुढे आल्याने मार्चमधील तपासाची व्याप्ती आणि त्यानंतरच्या चौकशीवरही चर्चा सुरू झाली आहे.

…तर स्त्री भ्रूणांचे गर्भपात झाले नसते
मार्च महिन्यातील कारवाईनंतर आरोपींच्या संपूर्ण नेटवर्कचा माग काढण्यात यश आले असते, तर यवतमध्ये मे-जून महिन्यात समोर आलेले मोठे रॅकेट कदाचित आधीच उघडकीस आले असते, अशी चर्चा तपास वर्तुळात आहे.

राज्यव्यापी नेटवर्कचा संशय
यवत प्रकरणात १२ ते १५ डॉक्टरांच्या संपर्काचे धागेदोरे समोर आले आहेत. हजारो महिलांची गर्भलिंग चाचणी झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे हे प्रकरण केवळ एका गावापुरते किंवा एका जिल्ह्यापुरते मर्यादित नसून राज्यव्यापी नेटवर्क असण्याची शक्यता तपास यंत्रणा पडताळून पाहत आहेत. यवत, राहाता आणि शिरूर या तिन्ही ठिकाणच्या तपासातील धागे एकत्र केल्यानंतर नरेंद्र ठाकरेची भूमिका अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *