फोटो-सीसीटीव्ही पाहताना भावनांचा बांध फुटला, नसरापूर प्रकरणी साक्ष देताना साक्षीदारांना अश्रू अनावर

नसरापूर येथे चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याच्याविरोधात पुण्याच्या विशेष न्यायालयात शुक्रवारी सहा साक्षीदारांनी साक्ष नोंदविली. त्यामध्ये पीडितेची आई, वडील, पीडितेच्या मृत्यूच्या कारणांचा पंचनामा करणारे पंच आणि आरोपीला पीडितेसमवेत पाहणाऱ्या दोन साक्षीदारांना साक्ष नोंदविताना अश्रू आवरता आले नाहीत. दरम्यान, आरोपीविरोधात दाखल आरोपपत्रात पुरावा नष्ट केल्याचे कलम वाढविण्याचा अर्ज सरकार पक्षातर्फे करण्यात आला.

भोरमधील हृदयद्रावक घटना

भोर तालुक्यातील नसरापूर येथे एक मे रोजी साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक व अनैसर्गिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५, रा. भोर) याच्याविरोधात राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात गुरुवारी आरोपीविरोधात आरोप निश्चित करण्यात आले.

या खटल्यात एकूण ८२ साक्षीदारांची यादी सरकार पक्षातर्फे सादर करण्यात आली आहे. त्यापैकी पहिल्या सहा साक्षीदारांची साक्ष विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयासमोर नोंदविली; तर बचाव पक्षातर्फे ॲड. हिंमतराव सूर्यवंशी यांनी साक्षीदारांची उलटतपासणी घेतली.

सर्व साक्षीदारांना अक्षरशः रडू कोसळले

पीडितेच्या मृत्यूच्या कारणांची चौकशी करणारा पंचनामा (इन्क्वेस्ट पंचनामा), साक्षीदारांना बजावलेले समन्स आणि त्यांचे जबाब, एफआयआरची प्रत, पीडितेचा जन्मदाखला आदी कागदपत्रे सरकार पक्षातर्फे न्यायालयासमोर सादर करण्यात आली; तसेच छायाचित्रे, घटनास्थळावरील सीसीटीव्हीतील चित्रीकरण आदी महत्त्वाचे पुरावे मांडण्यात आले. आरोपीने पीडितेचे अपहरण केल्यानंतर तिचा शोध घेणाऱ्या तीन ग्रामस्थांनीही न्यायालयासमोर साक्ष नोंदविली. सीसीटीव्ही चित्रीकरणात आरोपीला साक्षीदारांनी ओळखले. छायाचित्रे आणि सीसीटीव्ही पाहताना सर्व साक्षीदारांना अक्षरशः रडू कोसळले. या प्रकरणातील सहाव्या साक्षीदाराची साक्ष नोंदविण्याची प्रक्रिया आज (शनिवारी) सुरू राहणार आहे.

८२ साक्षीदारांची साक्ष न्यायालयात नोंदवणार

पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीविरोधात एकूण ११०० पानांचे आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले आहे. त्यामध्ये एकूण सव्वाशे साक्षीदारांचा समावेश असून, त्यापैकी ८२ साक्षीदारांची साक्ष न्यायालयात नोंदविण्यात येणार आहे. गुन्हा केल्यानंतर आरोपीने बॉडी लपवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानुसार, आरोपीविरोधात दाखल आरोपपत्रात भारतीय न्याय संहितेच्या कलम २३८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी कलमवाढीचा अर्ज पुणे ग्रामीण पोलिसांनी न्यायालयासमोर सादर केला. त्यावर सरकार आणि बचाव पक्षातर्फे युक्तिवाद करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *