युद्धात आणि प्रेमात सगळं माफ असतं असं म्हणतात. एखद्या व्यक्तीवर प्रेम होणं म्हणजे एखाद्या व्यक्तीसाठी आपण आपलं सर्वस्व अर्पण करणं असं मानलं जातं. या नात्यात विश्वास आणि पारदर्शकता तितकीच महत्त्वाची आहे. पण एकदा या नात्यात संशयाचं भूत घुसलं तर त्याचे खूप वाईट परिणाम होऊ शकतात. खरंतर एखाद्या व्यक्तीवर प्रेम केलं तेव्हा त्या व्यक्तीवर विश्वास ठेवणं अपेक्षित आहे. किंवा नाहीच जमलं तर वेगळं राहणं हा एक पर्याय असू शकतो. पण कल्याण जवळील आंबिवली येथे असा पर्याय न अवलंबता अतिशय निर्घृण कृत्य समोर आलं आहे.
चारित्र्याच्या संशयावरुन कल्याण जवळील आंबिवली इथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणाने आपल्या प्रेयसीची निर्घृणपणे हत्या केली आहे. चारित्र्याच्या संशयातून त्याने हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. तरुण इतक्या निर्घृणपणे वागूच कसा शकतो? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
रुक्सार अन्सारी असं मृत तरुणीचं नाव आहे. तर सतीश वाघे असं आरोपी प्रियकराचं नाव आहे. चारित्र्यावर संशय घेत आरोपी प्रियकराने रुक्सारला लाथा-बुक्क्यांनी आणि काठीने बेदम मारहाण केली. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने घरातील टीव्ही आणि पाण्याने भरलेला हंडा रुक्सारच्या डोक्यात टाकला. या हल्ल्यात रुक्सार गंभीर जखमी झाली. रुक्सारच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रुक्सारला आधी टिटवाळा आणि नंतर उल्हासनगरच्या सेंट्रल रुग्णालयात नेलं. पण तोपर्यंत उशिर झाला होता. डॉक्टरांनी रुक्सारला मृत घोषित केलं.
विशेष म्हणजे रुक्सारला मारहाण केल्यानंतर तिला घेऊन गेलेल्या रुग्णालयाच्या बाहेरच फिरत होता. रुक्सारच्या मृत्यू झाल्याची घोषणा डॉक्टरांनी केल्यानंतर संतप्त झालेल्या तिच्या नातेवाईकांनी आरोपी सतीशला पकडलं आणि त्याला चांगलाच चोप दिला. यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं.
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, सतीश आणि रुक्सार हे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून एकत्र राहत होते. पण चारित्र्याच्या संशयातून आरोपी सतीशने 22 वर्षीय रुक्सारचा जीव घेतला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच आरोपीला कठोरात कठोक शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे.
