नातवाने आजीची गळा चिरून केली हत्या, डेबिट कार्डवरुन झालेल्या भांडणाने नातंच संपवलं; नागपुरातील घटना

नातवानेच आपल्या आजीची निर्दयीपणे हत्या केल्याच्या घटनेमुळे नागपुरात खळबळ उडाली आहे. पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. आरोपी नातवाने 65 वर्षीय आजीची चाकूने गळा चिरुन हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पाचपावली पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. पोलिसांनी अर्ध्या तासातच आरोपीला ताब्यात घेतलं आहे. प्राथमिक तपासात डेबिट कार्डच्या वापराच्या संशयातून हा खून झाल्याचे समोर आले आहे.

नागपुरात तरुणाने स्वतःच्या चुलत आजीची गळा चिरून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मृत महिलेची ओळख इंदू चव्हाण (वय 65) अशी असून त्या पाचपावली परिसरात राहत होत्या. गुरुवारी सकाळच्या सुमारास पाचपावली पोलिस स्टेशनला एका घराचे दार बाहेरून कुलूपबंद असून घरातून दुर्गंधीयुक्त वास येत असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घराचे दार उघडून आत प्रवेश केला असता, इंदू चव्हाण यांचा मृतदेह घरामध्ये आढळून आला. मृतदेहाजवळ रक्त सांडलेलं होतं.

गळ्यावर धारदार शस्त्राने वार 

प्राथमिक तपासात त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. या घटनेनंतर पोलिसांनी परिसरात तपास सुरू करत तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताचा शोध सुरू केला.तपासादरम्यान मृत महिलेच्या चुलत नातवावर पोलिसांचा संशय बळावला. चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली.

डेबिट कार्डवरुन भांडण

पोलिसांच्या माहितीनुसार, इंदू चव्हाण यांना आरोपी त्यांच्या नकळत डेबिट कार्डचा वापर करत असल्याचा संशय होता. या कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होता. घटनेच्या दिवशीही याच मुद्द्यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर संतापाच्या भरात आरोपीने चाकूने इंदू चव्हाण यांच्यावर हल्ला केला व त्यांचा गळा चिरून खून केल्याचे समोर आले आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पाचपावली पोलिसांनी जलद गतीने तपास करत तांत्रिक पुराव्यांच्या आधारे अवघ्या अर्ध्या तासात आरोपीला ताब्यात घेतले.  पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला या प्रकरणाचा अधिक तपास पाचपावली पोलिस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *