मोबाईल हिसकावून पोलीस स्टेशनला नेण्याची बतावणी, मामाच्या घरी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीवर रेल्वे यार्डात अत्याचार; कल्याणमध्ये खळबळ

कल्याणमध्ये 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला रेल्वे यार्डात नेऊन लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी कल्याण जीआरपी पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी सौरभ सोनवणे याला अटक करून बेड्या ठोकल्या आहेत. रेल्वे यार्डमध्ये याआधी असाच प्रकार घडला होता. त्यात आता ही घटना घडल्यामुळे त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पीडित अल्पवयीन आपल्या मामाला भेटण्यासाठी आलेली

अहिल्यानगरहून 14 वर्षीय पीडित अल्पवयीन आपल्या मामाला भेटण्यासाठी आली होती. अहिल्यानगरहून निघाल्यानंतर ती कल्याण बस स्थानकात उतरली. त्यानंतर तिला खोपोलीला आपल्या मामाकडे जायचं होतं. त्यामुळे ती कल्याण रेल्वे स्थानकात पोहोचली आणि तिथे ती लोकलची वाट पाहात होती. हीच संधी साधत ओळख नसलेला आरोपी सौरभ सोनवणे तिथे आला आणि त्याने कोणतीही ओळख नसताना पीडित मुलीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला.

मुलीने जेव्हा आपला मोबाईल परत मागितला, ‘मोबाईल पाहिजे असेल तर माझ्यासोबत पोलीस स्टेशनला चल’, अशी बतावणी त्याने केली. पोलीस स्टेशनला जावं लागेल हे तिच्या लक्षात आलं. त्यामुळे ती घाबरून त्याच्यासोबत जायला निघाली. मात्र, आरोपी सौरभने तिला पोलीस स्टेशनला नेण्याऐवजी फसवणूक करून कल्याण रेल्वे यार्डात नेलं. त्यानंतर तिथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि तो तिला तिथेच सोडून निघून गेला.

दरम्यान, पीडित मुलगी त्वरित कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात पोहोचली आणि घडलेली घटना पोलिसांना सांगितली. घटनेचं गांभीर्य ओळखून कल्याण रेल्वे क्राईम ब्रँच आणि जीआरपी पोलिसांनी तत्काळ रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासत पोलिसांनी आरोपी सौरभ सोनवणे याला शोधून काढून त्याला अटक केली आहे.

नसरापूरच्या नराधमाभोवती फास आवळला

नसरापूर येथे चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या नराधम भीमराव कांबळेविरोधात 1,100 पानांचे आरोपपत्र पुणे ग्रामीण पोलिसांनी शनिवारी रात्री विशेष न्यायालयात सादर केले. पुण्यासह संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या या गुन्ह्याचा अवघ्या 15 दिवसांत तपास पूर्ण करून पन्नासहून अधिक साक्षीदारांचे जबाब, सीसीटीव्ही चित्रीकरण, डीएनए चाचणीसह वैद्यकीय व न्यायवैद्यक अहवाल आदी भक्कम पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *