चार महिन्यांपूर्वी म्हणजेच 28 जानेवारी रोजी राष्ट्रवादीचे माजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने हादरलेल्या बारामतीत पुन्हा एकदा शिकाऊ विमान कोसळल्याची घटना घडली आहे. रेडबर्ड एव्हिएशन कंपनीचं प्रशिक्षणार्थी विमान गोजुबाबी गावाच्या हद्दीत कोसळल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली. सुदैवाने या अपघातात शिकाऊ वैमानिक सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
नेमका कसा झाला अपघात?
मिळालेल्या माहितीनुसार, रेडबर्ड एव्हिएशन अकॅडमीचे हे प्रशिक्षण विमान नियमित सरावासाठी उड्डाण करत होतं. दरम्यान, अचानक तांत्रिक बिघाड अथवा अन्य कारणामुळे विमानाचा ताबा सुटल्यानं ते गोजुबाबी गावाजवळ कोसळलं. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचं पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून परिसर बंदोबस्ताखाली घेण्यात आला आहे.
याच परिसरात अजित पवारांच्या विमानाचा अपघात
या अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तांत्रिक बिघाड, हवामान किंवा मानवी चूक यापैकी कोणत्या कारणामुळे विमान कोसळलं? याचा तपास सध्या सुरू करण्यात आला आहे. नागरी विमान वाहतूक विभागाकडूनही चौकशी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, याच गोजुबाबी गावाच्या परिसरात चार महिन्यांपूर्वी माजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला होता. तिथून 1 किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला असून, त्यामुळे पुन्हा त्याच भागात घडलेल्या या घटनेमुळे बारामतीकरांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
पार्थ पवारांची भागिदारी असलेल्या ‘अमेडिया’ कंपनीला दणका
उपमुख्यमंत्रिपदावर असताना विमान अपघातात निधन झालेले दिग्गज नेते अजित पवार यांचे पुत्र आणि खासदार पार्थ पवार हे भागीदार असलेल्या ‘अमेडिया’ कंपनीला नोंदणी महानिरीक्षकांनी दणका दिला आहे. सरकारी जमीन खरेदी करताना आयटी पार्क स्थापन करण्याच्या नावाखाली घेतलेली मुद्रांक शुल्कमाफी मिळण्याचा या कंपनीचा अर्ज आता नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांनी फेटाळून लावला आहे.
मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी ‘अमेडिया’ कंपनीला बजावलेला २२ कोटी ४६ लाख रुपयांचा मुद्रांक शुल्क भरण्याचा आदेश बिनवडे यांनी कायम केला. त्यामुळे मुद्रांक शुल्कातून माफी मिळवण्याची पार्थ यांच्या कंपनीची योजना फसली आहे. ‘अमेडिया’ कंपनीला या आदेशाविरोधात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे अपील करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
