वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश परीक्षा ‘यूजी नीट’च्या पेपरफुटी प्रकरणात सोळा संशयितांमध्ये नाशिक व अहिल्यानगरातील दोघांचा समावेश आहे. कुरिअरद्वारे प्रश्नपत्रिकांचा संच पुढे पाठविणाऱ्या संशयित शुभम मधुकर खैरनार (वय 27, रा. इंदिरानगर) याला नाशिक शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, दुसरा संशयित अहिल्यानगरातील धनंजय लोखंडे आहे. शुभम हा ‘बीएएमएस’च्या तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत असून, करिअर कौन्सलर म्हणून तो कार्यरत होता. त्याने लाखो रुपयांच्या व्यवहारातून हा उद्योग केला असून, त्याला ‘सीबीआय’च्या ताब्यात दिले जाणार आहे.
‘सीबीआय’ चौकशीत पुढील खुलासे होणार
नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) 2 मे रोजी नीट परीक्षा घेण्यात आली होती. तत्पूर्वी सोशल मीडियावर परीक्षेची प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याने राजस्थान येथील ‘एसओजी’ पोलिसांमार्फत तपास सुरू होता. त्यातच केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) या प्रकरणातील तपासाचे आदेश देण्यात आले. त्यानुसार मंगळवारी (दि. 12) महत्त्वपूर्ण खुलासे झाले. या प्रकरणात नाशिक शहरातील संशयित शुभम खैरनार याला ताब्यात घेतले आहे. कुरिअरद्वारे आलेली प्रश्नपत्रिका त्याने कुरिअरद्वारेच हरियाणातील गुरुग्राममध्ये पाठवली. तेथून प्रश्नपत्रिका राजस्थानपर्यंत पोहोचल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले असून ‘सीबीआय’ चौकशीत पुढील खुलासे होणार आहेत. केवळ पैसे कमाविण्याच्या हेतूने संशयिताने हे कृत्य केल्याची माहिती पोलिस दलातील सूत्रांनी दिली.
पलायनाचा प्रयत्न फसला
संशयित शुभम खैरनार याला ताब्यात घेण्याबाबत ‘सीबीआय’चे मंगळवारी (दि. 12) सकाळी नाशिक शहर पोलिसांना पत्र प्राप्त झाले. तातडीने तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्याचा पत्ता शोधण्यात आला. गुन्हे उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांनी गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाला पाचारण केले. सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर यांचे पथक संशयिताच्या मागावर होते. त्यावेळी संशयित हा केशकर्तन करून (पूर्णतः टक्कल) देवदर्शनाच्या नावाखाली पलायन करण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी दीड तासात शिताफिने त्याला ताब्यात घेतल्यावर संशयिताने गुन्ह्याची कबुली दिली.
भावाकडे अवैध पिस्तूल
मार्च 2026 मध्ये नांदगाव तालुक्यातील कोर्ट रोड भागातील मुक्ताई मेडिकलमध्ये पोलिसांना गावठी कट्टा (पिस्तूल) सापडला होता. त्या प्रकरणात संशयित भावेश खैरनार आणि ढेब्या उर्फ रूद्राक्ष दीपक सोनवणे यांना अटक झाली होती. त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली होती. भावेशने ढेब्याकडून पिस्तूल खरेदी केली होती. भावेश हा पेपरफुटी प्रकरणातील संशयित शुभमचा लहान बंधू असल्याचे कळते.
जिल्ह्यात 8,856 परीक्षार्थी
नाशिक जिल्ह्यातील 21 केंद्रांवर 3 मे रोजी ‘नीट’चे आयोजन केले होते. जिल्ह्यातील 8 हजार 856 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. या सर्व विद्यार्थ्यांना आता पुन्हा पेपर द्यावा लागणार आहे. दहावी झाल्यापासून कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून ‘नीट’साठी विद्यार्थ्यांची तयारी सुरू होते. पालकही यासाठी फी पोटी पाण्यासारखा पैसा खर्च करतात. अतिशय काटेकोर दीनचर्या आणि सातत्यपूर्ण अभ्यास या कचाट्यात दोन वर्षे सापडलेली ही मुले, परीक्षा झाल्यानंतर काहीशी सैलावलेली असतानाच, पेपर फुटल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यातच आता ही परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय ‘एनटीए’ने जाहीर केल्याने, संबंधित विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.
शुभमबाबत थोडक्यात माहिती
संशयित शुभम खैरनारचे मध्य प्रदेशातील सिहोरमध्ये वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण सुरू
