नागपूरमध्ये नायब तहसीलदाराने पत्नी, मुलगी गावी गेलेले असताना…; बेडरुममधलं दृष्य पाहून पोलीसही थक्क

नागपूर जिल्ह्याचा हिंगण्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. येथील नायब तहसीलदाराने आत्महत्या केली आहे. या नायब तहसीलदाराने राहत्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन स्वत:चं आयुष्य संपवलं. हा सारा प्रकार वानाडोंगरीतील ग्रीन फिल्ड सोसायटीत घडला.

कोण आहे हा नायब तहसीलदार

मिळालेल्या माहितीनुसार, मयत नायब तहसीलदाराचं नाव वैभव रामेश्वर राठोड असं आहे. वैभव हे 42 वर्षांचे होते. ते मौदा येथे कार्यरत होते. रविवारी सायंकाळी घरात एकटे असताना वैभव यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. वैभव यांनी हे टोकाचं पाऊल उचललं तेव्हा पत्नी आणि मुलगी गावी गेले होते. पत्नी आणि मुलगी विवाहसोहळ्यासाठी गावी गेले होते, अशी माहिती समोर आली आहे. घरी कोणीच नसताना वैभव यांनी दार आतून बंद करुन गळफास लावून घेतला.

बहिणीने पोलिसांना केला फोन

वैभव राहत असलेल्या घराचं दार त्यांनी आतून बंद होते. वैभव यांच्या बहिणीने दार वाजवले व फोन केला पण आतून त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना संशय आला. बहिणीने पोलिसांना माहिती देताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दार उघडून आत प्रवेश केला.

बेडरुममध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

पोलिसांनी दार तोडून घरात प्रवेश केल्यानंतर पोलिसांना वैभव यांचा मृतदेह बेडरुममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. समोरचं दृष्य पाहून पोलीसही हादरले. वैभव हे मागील काही दिवसांपासून तणावात असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आत्महत्येचे ठोस कारण अद्याप अस्पष्ट झालेले नसून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. वैभव यांच्या रुममध्ये कोणतीही सुसाइड नोट किंवा संशयास्पद वस्तू आढळली नाही. पोलिस वैयक्तिक, व्यावसायिक व आर्थिक कारणांचा तपास करत आहेत वैभव यांच्या मोबाइल रेकॉर्ड्स तपासणी सुरू असल्याची माहितीही समोर येत आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशनने पंचनामा केला असून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. या प्रकरणामध्ये आकस्मिक मृत्यूची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे.

कुटुंब आणि सहकाऱ्यांना मोठा धक्का

वैभव राठोड शांत स्वभावाचे व संयमी अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या कुटुंबाबरोबरच सहकाऱ्यांनाही मोठा धक्का बसला आहे. या घटनेची माहिती नागपूर व महसूल विभागात वाऱ्याच्या वेगासारखी पसरली असून वैभव यांच्या मृत्यूबद्दल वेगवेगळे तर्क लावले जात असले तरी पोलीसांनी या प्रकरणातील पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि इतर महत्त्वाचा तपशील समोर आल्यानंतर कारण समजू शकेल असं म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *