पावसाळा आणि घोडबंदरच्या गायमुख घाटातील कोंडी हे समीकरण गेल्या काही वर्षांपासून कायम झाले असून यंदाच्या पावसाळ्यातही या पट्ट्यात वाहनचालकांची वाट बिकट होण्याची शक्यता आहे. आधीच अरुंद रस्ता, वन विभागाच्या हद्दीत रस्त्याचे रखडलेले एकत्रिकरण, यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव यामुळे या घाट रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना तासन्तास कोंडीत अडकावे लागते. या दुरवस्थेपायी अपघातांमध्ये नागरिकांना जीवही गमवावा लागला आहे. तरीही प्रशासकीय व राजकीय पातळीवरील अनास्थेमुळे या मार्गाच्या वाटेतील अडथळे काही केल्या संपण्याची चिन्हे नसल्याने नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
रस्त्याची चाळण होणार
घोडबंदर रोडवर गायमुख घाटाचा वापर प्रामुख्याने जेएनपीटीमधून मुंबई-अहमदाबादच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी होतो. या घाटातून दहिसर, बोरिवली, मिरा-भाईंदर, वसई – विरार, पालघर, गुजरातच्या दिशेने जाणारी खासगी वाहने, परिवहन सेवेच्या बसचा प्रवास होतो. त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या या मार्गावरील घाट रस्त्याची प्रत्येक पावसाळ्यात चाळण होत असल्याने वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. या रस्त्यावर केलेली दुरुस्ती पावसाळ्यात टिकून राहावी, यासाठी विविध पद्धतींचा वापरही पावसाळापूर्व कामांदरम्यान केला जातो.
