मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांना तत्काळ वैद्यकीय मदत मिळणे अपेक्षित असताना कूपर हॉस्पिटलमध्ये दोन दिवसांत दोन रुग्णांचा आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यातील एका तरुणीचा स्ट्रेचरवरुन पडून, तर दुसऱ्याचा ‘आयसीयू’त बेड न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप दोन्ही रुग्णांच्या नातेवाइकांनी केला आहे.
गोरेगावकर तरुणीला पोटदुखी
गोरेगाव येथे राहणाऱ्या संध्या यादव (२७) हिला शनिवारी सकाळी तीव्र पोटदुखीचा त्रास होत होता. कूपर रुग्णालयात वैद्यकीय उपचार देऊन तिला घरी पाठवण्यात आले. त्याच दिवशी रात्री तिला पुन्हा तीव्र पोटदुखीचा त्रास सुरु झाल्यानंतर पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
स्ट्रेचरवरुन खाली पडली
‘आयसीयू’मध्ये बेड नसल्याचे सांगून डॉक्टरांनी स्ट्रेचरवर ठेवून तिच्यावर उपचार सुरू केल्याची माहिती तिचे काका राजेंद्र यादव यांनी दिली. उपचारादरम्यान ती खाली पडल्याचा आवाज आल्याने सुरक्षारक्षकाने दरवाजा उघडला. तेव्हा ‘आयसीयू’बाहेर बसलेल्या तिच्या पालकांना संध्या खाली पडल्याचे दिसले. त्यांनी मुलीकडे धाव घेतल्यावर डॉक्टरांनी त्यांना बाहेर जाण्यास सांगितले.
मुलीच्या काळजीने व्यथित झालेल्या पालकांनी तिला नेमके काय झाले आहे याची वारंवार विचारणा करुनही समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याचा आरोप त्यांनी केला. अखेर पालकांनी तिचे काका राजेंद्र यांना बोलावून घेतले. त्यांनाही समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने रुग्णालय प्रशासनाकडे विचारणा केली.
सीपीआरचे प्रयत्न अयशस्वी
त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने संध्याची प्रकृती बिघडली असून, तिला ‘सीपीआर’ देऊन वाचवण्याचे प्रयत्न करत असल्याचे सांगितले. रविवारी सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी संध्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अखेर कुटुंबीयांनी गोरेगाव पोलिस ठाण्यात मदतीसाठी धाव घेतली. शवविच्छेदन करण्याचीही कुटुंबीयांची तयारी नव्हती.
नालासोपाऱ्यातील तरुणाचा बेडअभावी मृत्यू
दुसरीकडे, नालासोपारा येथे राहणाऱ्या कैलास सिंह (३८) यांना वैद्यकीय उपचारासाठी शनिवारी कूपर रुग्णालयामध्ये नेण्यात आले होते. चित्रपटसृष्टीमध्ये मदतनीस म्हणून काम करत असलेल्या कैलास यांना अतिदक्षता विभागात (आयसीयू) तातडीने दाखल करण्याची गरज असतानाही त्यांना बेड मिळाला नाही. त्यामुळे जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात आले. तिथे त्यांचा उपचारादरम्यान रात्री ११ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला.
पत्नीचा धाय मोकलून आक्रोश
त्यांच्या पत्नी पूजा सिंह यांनी त्यांना ‘आयसीयू’ची गरज असताना तिथे दाखल का करण्यात आले नाही, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर, ‘सर्वसामान्य गरजू रुग्णांना त्वरित वैद्यकीय मदत मिळत नसेल तर त्यांनी कुणाकडे आशेने पाहायचे? आता माझ्या दोन लहान मुलांचे काय होणार? असे प्रश्न विचारत पूजा सिंह धाय मोकलून रडायला लागल्या.
कूपर रुग्णालयाच्या ‘आयसीयू’त दहा बेड असून त्यातील काही बेड आरक्षित ठेवले जातात. स्थानिक लोकप्रतिनिधी, वैद्यकीय अधीक्षकांच्या संपर्कातून येणारे रुग्ण यांच्यासाठी काही बेड राखून ठेवले जात असल्याने ते सर्वसामान्यांसाठी खुले केले जात नाहीत, असेही निदर्शनास आले आहे.
