दुपारनंतर भट्टीइतकी उष्णता; सायंकाळनंतर काळोखं संकट, हवामानाचे चक्रावणारे 24 तास

एप्रिल महिन्याच्या मध्यापासूनच उष्णतेचा तडाखा अधिक तीव्रतेनं बसण्यास सुरुवात झाली आणि देशाच्या उत्तरेपासून ते अगदी दक्षिणेपर्यंत उकाड्यानं नागरिक बेजार झाले. अपवाद ठरला तो म्हणजे पूर्वोत्तर भारत. महाराष्ट्रातही अशीच स्थिती दिसून आली, जिथं उकाड्यामुळं शालेय आणि कार्यालयीन वेळांमध्येसुद्धा काही जिल्ह्यांत बदल करण्यात आले. याचदरम्यान पुढील 24 तासांसाठीचा अर्थात 25 एप्रिलसाठीचा हवामान अंदाज समोर आला, ज्यामुळं या स्थितीतून किमान दिलासा मिळताना दिसत आहे.

केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार देशभरात 25 एप्रिलला संमिश्र वातावरण असेल. एकिकडे उत्तर पश्चिम भारतासह मध्य भारताच्या अनेक भागांमध्ये प्रचंड उकाडा पाहायला मिळेल, तर दुसरीकडे वादळ, सोसाट्याचा वारा आणि पावसाची हजेली असेल असा अंदाज आहे. हवामान तज्ज्ञांनी शनिवारी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि विदर्भात होरपळवणारी उष्णता असेल असं स्पष्ट करत दुपारच्या वेळी नागरिकांनी घराबाहेर पडू नये असा इशारा जारी केला आहे. या भागांमध्ये उष्णतेची लाट सक्रिय असेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

महाराष्ट्रात यलो अलर्ट, पण पावसाचा की उन्हाचा?  

देशाप्रमाणं सध्या महाराष्ट्रातसुद्धा दुहेरी हवामान पाहायला मिलत आहे. जिथं उन्हाळा आणि पावसाळा अशी दोन्ही प्रकारची चित्र दिसून येत आहेत. राज्यात सध्या पूर्वमोसमी पावसाची हजेरी असून, मुंबई शहर आणि उपनगरासह कोकणासह विदर्भात उष्ण हवामान असेल. तर, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह पावसाची हजेरी असेल असं सांगत इथं यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाबळेश्वर, सातारा, पुणे, कोल्हापूर इथं डोंगरमाथ्यावर सायंकाळनंतर तापमानात किंचीत घट अपेक्षित आहे, तर आकाश अंशत: ढगाळ असेल असा प्राथमिक अंदाज आहे.

सध्या महाराष्ट्रात जो पाऊस पडत आहे, तो मान्सून नसून या पूर्वमोसमी पावसाच्या सरी आहेत. ज्यामुळं पुढील 24 तासांमध्ये सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, परभणी, नांदेडमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड इथं उष्ण आणि दमट हवामानामुळं उष्मा अधिक तीव्रतेनं जाणवेल असा अंदाज आहे. नागरिकांनी यादरम्यान भरपूर पाणी प्यावं, शक्यतो तीव्र उन्हात फिरणं टाळावं आणि आरोग्य जपावं असाच सल्ला यंत्रणा देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *