‘मला पण एक सिगारेट घे रे’; नकार देताच बेदम मारहाण, नाशिकमध्ये तरुणाला मध्यरात्री संपवलं

सिगारेट देण्यास नकार दिल्याचा राग आल्यानं तरुणावर चॉपरने वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना पंचवटीतील पेठरोड परिसरात घडली. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे. राहुल कृष्णा राऊत (वय २७, रा. नवनाथ नगर, पेठ रोड) असं मृत तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोक्यावर व चेहऱ्यावर जोरदार प्रहार

शनिवारी (दि. १८) एप्रिल रात्री साडेनऊच्या सुमारास राहुल राऊत हा टिल्लू पवार व सुनील गुंजाळ या मित्रांसह नवनाथ नगर परिसरातील साईबाबा मंदिराजवळ बसला होता. यावेळी रोहिदास वामनराव आहेर (वय २६, रा. नवनाथ नगर) हा तेथे आला व त्याने राहुलकडे ‘मला पण एक सिगारेट घे रे’, अशी मागणी केली. मात्र, राहुलने नकार दिल्याने संतापलेल्या रोहिदासने आपल्या जवळील चॉपरच्या उलट्या बाजूने राहुलच्या डोक्यावर व चेहऱ्यावर जोरदार प्रहार केले. या हल्ल्यात राहुल गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान सोमवारी (दि. २०) एप्रिल पहाटे दोनच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, राहुलचे वडील कृष्णा हरी राऊत यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला आहे.

सराईत आरोपीचा शोध सुरू

हल्ला करणारा रोहिदास आहेर हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी पंचवटी पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा तसेच म्हसरूळ पोलिस ठाण्यात घरफोडी, मारामारी आणि दहशत निर्माण केल्याचे गुन्हे दाखल आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख व वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

आदिशक्तीच्या दरबारात चोरी!

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंगी गडावरील मंदिराच्या नक्षीकामातील साडेबावीस किलो चांदीमध्ये तफावत आढळून आली आहे. विशेष म्हणजे विश्वस्तांनी व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे सुट्टीवर असताना रात्रीच्या वेळी गर्भगृहातील चांदी काढल्याची बाब विभागीय आयुक्त कार्यालयातील चौकशीत निदर्शनास आली आहे.

या प्रकरणी ट्रस्टचे तत्कालिन अध्यक्ष, विश्वस्त व संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून अपहार झालेल्या चांदीची रक्कम व्याजासह वसूल करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *