रोज 80 हजार वाहनं जातात तिथून एकही गाडी जाणार नाही! राज्यातील सर्वात महत्त्वाचा मार्ग उद्यापासून 2 दिवस बंद

महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रवासी आणि माल वाहतूक करणाऱ्या रस्त्यांपैकी एक असलेला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे दोन दिवस बंद राहणार आहे. यासंदर्भातील तारीख आणि वेळ नुकतीच जाहीर करण्यात आली असून या वेळेनुसार प्रवाशांनी आपल्या प्रवासाचं नियोजन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. नेमका हा मार्ग कधी आणि कशासाठी बंद असणार जाणून घेऊयात सविस्तरपणे…

कोणता मार्ग आणि कशासाठी असणार बंद?

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 23 व 24 एप्रिल रोजी प्रत्येकी तीन तास वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत डोंगरगाव-कुसगाव परिसर (किमी. क्र. 58/500) येथे डागडुजीचं काम केलं जाणार आहे. पुलाचे शटरिंग काढणे आणि रंगकाम करण्यासाठी हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हे काम केलं जाणार आहे. परिणामी, वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.

कुठून कशी वळवली जाणार वाहतूक?

23 एप्रिल रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. या कालावधीत सर्व वाहने किवळे, देहूरोडमार्गे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर वळवून कुसगाव टोल प्लाझामार्गे पुढे सोडण्यात येणार आहे. त्यानंतर 24 एप्रिल रोजी याच वेळेत पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. वाहनांना कुसगाव टोल प्लाझामार्गे राष्ट्रीय महामार्ग 48 वरून देहूरोड, किवळेमार्गे पुण्याकडे नियमित वेगवान प्रवासाला या वळवले जाईल. द्रुतगती मार्गावरील कामामुळे तात्पुरता ब्रेक लागणार असला, तरी पुलाच्या सुरक्षेसाठी हे काम आवश्यक आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

नंबरही केले जारी 

या दरम्यान, पर्यायी मार्गांवर वाहतुकीचा ताण वाढण्याची शक्यता असल्याने वाहनचालकांनी प्रवासाचे नियोजन करूनच मार्गस्थ व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. काही अडचण आल्यास वाहनचालकांनी द्रुतगती मार्ग नियंत्रण कक्ष 9822498224 तसेच 9833498334 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही प्रशासनाने कळवले.

रोज किती वाहनं जातात?

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेचं अधिकृत नाव यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग असं आहे. या मार्गावरून दररोज सरासरी 65 हजार ते 80 हजार वाहनं प्रवास करतात. मात्र, सुट्ट्यांच्या दिवशी किंवा विकेंडला ही संख्या वाढून एक लाख ते दीड लाखांपर्यंत जाते. सध्या होत असलेली वाहतूक कोंडी पाहता, हा मार्ग 10 पदरी करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *