पुण्यात वाहतूक कोंडी असलेल्या मार्गांवर ‘पीएमपी’ बसच बंद? धक्कादायक माहिती उघड

पीएमपी’ बंद करण्याच्या निकषांमध्ये वाहतूक कोंडी असलेला रस्ता आणि कमी उत्पन्न असलेले मार्ग अग्रक्रमाने घेतले गेले आहेत. एका ‘आरटीआय’च्या निमित्ताने ही माहिती समोर आली आहे. यामुळे ‘पीएमपी’च्या धोरणांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रत्यक्षात कोंडी कमी करण्यासाठी अशा मार्गांवर अधिक बस धावणे गरजेचे असताना, उलट सेवा बंद केली जात आहे. यामुळे नागरिक खासगी वाहनांकडे वळून रस्त्यावरची गर्दी वाढू शकते.

मार्ग बंद केल्यामुळे खासगी वाहने रस्त्यावर येतात. त्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्ते तुषार रत्नपाल यांनी ‘पीएमपी’कडे माहिती अधिकारात निकष मागितले होते. त्यातून ही माहिती समोर आली.

असे आहेत निकष

बस मार्ग सुरू किंवा बंद करताना प्रवासी मागणी, ‘पिक अवर्स’मधील गर्दी, लोकसंख्या, नव्या वसाहती, आयटी पार्क, औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्र, पर्यायी वाहतूक उपलब्धता, रस्त्यांची स्थिती आणि आर्थिक व्यवहार्यता अशा निकषांचा विचार केला जातो.

मात्र, ‘सतत ट्रॅफिक जाम’ हाही मार्ग बंद करण्याचा निकष असल्याचे म्हटले आहे. कमी प्रवासी संख्या, तोटा, त्याच मार्गावर अन्य बस किंवा मेट्रो सेवा उपलब्ध असणे, सुरक्षा कारणे, प्रवाशांकडून वारंवार तक्रारी अशा कारणांनीही मार्ग बंद करण्याचे निर्णय घेतले जातात, असे ‘पीएमपी’ने दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

लोकप्रतिनिधींना प्रतिसाद

सत्ताधारी पक्षाचा अथवा राजकीय वजन असलेल्या लोकप्रतिनिधींचा फोन आल्यावर ‘पीएमपी’कडून संबंधित भागात ‘पीएमपी’ची सेवा सुरू केली जाते. मात्र, सध्या ‘पीएमपी’कडे बसची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे नवीन बस सुरू करताना कोणत्या तरी मार्गावरील बस कमी करावी लागते. त्यामुळे त्या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना फटका बसतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *