एकीकडे अमेरिका-इराण युद्धामुळे मध्य पूर्वेत तणावाची परिस्थिती आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी खनिज तेलाची वाहतूक विस्कळीत झाल्यानं जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्था संकटात सापडल्या आहेत. याच संधीचा फायदा घेत चीननं दक्षिण चिनी समुद्रात वेगवान हालचाली सुरु केल्या आहेत.
होर्मुझपेक्षा मोठा रस्ता रोखण्याची तयारी चीन नं सुरु केली आहे. फिलीपीन्स आणि जपान यांच्यात वाद सुरु असताना चीननं दक्षिण चीन समुद्राचं प्रवेशद्वार काही प्रमाणात रोखून धरण्याची तयारी सुरु केली आहे. या प्रवेशद्वारावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न चीनकडून सुरु आहेत. त्यासाठी स्कारबोरो शोलच्या जवळ जहाजं तैनात करण्यास सुरुवात झाली आहे. चीन या जहाजांच्या माध्यमातून समुद्राचं प्रवेशद्वार बंद करु शकतो.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं सॅटेलाईट फोटोंच्या माध्यमातून याबद्दलचं वृत्त दिलं आहे. चीननं दक्षिण चीन सागराच्या प्रवेशद्वारावर कशा पद्धतीनं फिल्डींग लावल्याचं या फोटोंमधून स्पष्ट होत आहे. या भागात चिनी जहाजांची संख्या अधिक आहे. त्यामुळे चिनी जहाजांच्या दृष्टीस न पडता अन्य कोणतंही जहाज या भागातून जाऊ शकत नाही.
