मद्यधुंद कारचालकाने अख्खं कुटुंब उद्ध्वस्त केलं; तरण्याबांड तरुणासह त्याच्या चिमुकल्याचाही मृत्यू, बायको-मुलगी गंभीर

कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यात घडलेल्या भीषण अपघातामध्ये एका कुटुंबातील मुलाला आणि त्याच्या वडिलांना आपला जीव गमवावा लागला आहे. सोमवारी दोघांच्या पार्थिवावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. तळसंदे-वाठार रस्त्यावर रविवारी सायंकाळी झालेल्या तिहेरी भीषण अपघातात अंबप (ता. हातकणंगले) येथील उदय अशोक जाधव (वय 34) आणि त्यांचा पाच वर्षांचा मुलगा धैर्यशील यांचा मृत्यू झाला आहे. मद्यधुंद अवस्थेतील चारचाकी चालकाने सलग तीन दुचाकींना धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात उदय यांच्या कुटुंबावर आभाळ कोसळले. पत्नी प्रियांका आणि 10 वर्षांची मुलगी ओमू गंभीर जखमी असून, त्यांच्यावर कोल्हापूर येथे उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसर हादरला असून, उदय यांचे वृद्ध आई-वडील आणि कुटुंब उघड्यावर पडले आहे.

नेमकं काय घडलं ?
रविवारी सायंकाळी साडेसात वाजता विशाळगडहून मिरजकडे चाललेल्या (KA 29 A 6815) या चारचाकीने तळसंदे गावाच्या वळणावर प्रथम मोहन बाबासाहेब शेटे (वय 55, रा. कुळरप, ता. वाळवा) आणि माधुरी अनिल बुड्डे (रा. पारगाव) यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोघेही जखमी झाले. त्यानंतर वाठारजवळ आमनापूर (ता. पलूस) येथून चावरेकडे निघालेल्या सुमोला धडक देऊन समोरून येणाऱ्या उदय जाधव यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि चारचाकी नाल्यात अडकली. केकले यात्रेसाठी निघालेले उदय, प्रियांका, ओमू आणि धैर्यशील हे रस्त्यावर फेकले गेले. या भीषण अपघातात चिमुकल्या धैर्यशीलचा जागीच मृत्यू झाला. उदय यांचा सोमवारी सकाळी कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. प्रियांका आणि ओमू यांच्यावर कोल्हापूरमध्ये, तर इतर जखमींवर कोडोली रुग्णालयात उपचार चालू आहेत.

एकुलता आधारस्तंभ कोसळला..
शिरोली एमआयडीसीमध्ये नोकरी करणारे उदय जाधव हे अंबप गणेश मंदिराजवळ वृद्ध आई-वडील, पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते. वडील अशोक जाधव यांना उदय हा एकुलता मुलगा, तर उदय यांना धैर्यशील हा प्रेमळ मुलगा होता. दोघांच्या अपघाती निधनानंतर प्रियांका आणि ओमू विमनस्क अवस्थेत दुःख सोसत आहेत. घरचा कर्ता निघून गेल्याने कुटुंबावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

चालकावर गुन्हा दाखल
चारचाकी चालक सदाशिव चिकय्या चिकन्नावरमठ (रा. सरवड, विजयपूर) याच्यावर हातकणंगले पोलिसांनी मद्य प्राशन करुन वाहन चालवणे, जीवितहानी आणि अपघात घडवणे, याबाबत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक भरत पाटील हे तपास करीत आहेत. या घटनेने रस्त्यावरील मद्धुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या चालकांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *