गंगापूर तालुक्यातील शिरजगाव परिसरात शिवना नदीच्या पात्रात एका तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मृत तरुणाच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा असल्याने हा मृत्यू अपघाती आहे की घातपात आहे, याबाबत पोलिस तपास करत आहे. गणेश अंबादास शिरसाट (वय 28, रा. शिरजगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, गणेश शिरसाट हा मूळचा शिरजगाव येथील रहिवासी होता. शिरसाट कुटुंबीतल तो एकुलता एक तरुण असून तो अविवाहित होता. काही दिवसांपूर्वीच त्याच्या आईचं निधन झालं. त्यामुळे तो वडिलांसह राहत होता. त्याला तीन विवाहित बहिणी आहेत. सकाळी 8 वाजेच्या सुमारास नदीपात्रात मृतदेह तरंगताना पोलीस पाटलांच्या निदर्शनास आला. त्यांनी तातडीने गंगापूर पोलिसांना पाचारण केले.
घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार सिंग राठोड, पोलीस उपनिरीक्षक मस्के तसेच कर्मचारी मनोज घोडके, विजय नागरे, रिजवान शेख, विजय पाखरे हे घटनास्थळी दाखल झाले.
शरीरावर चावा आणि जखमा…..
स्थानिक गुन्हे शाखेचे सहपोलिस निरीक्षक पवन इंगळे यांच्या पथकाने पाहणी केली असता गणेशच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमांच्या खुणा आणि चावा घेतला असल्याचं निदर्शनास आल आहे. हा मृत्यू अपघाती आहे की घातपात, याबाबत परिसरात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. सध्या पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. काही दिवसांपूर्वी पत्नीचे निधन झालं, त्यानंतर एकुलता एक मुलाचे निधन झाल्याने गणेशच्या वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
