22 रुद्राक्षांचा डबा, हिरव्या द्रव्याची बाटली, खरातच्या ऑफिसात बरंच काही सापडलं; बायको देशाबाहेर पळून जाण्याची शक्यता

धार्मिक विधीच्या नावाखाली मंतरलेले पाणी पाजून महिलेवर वेळोवेळी अत्याचार करून तिचा गर्भपात घडवून आणल्याप्रकरणी संशयित भोंदूबाबा अशोक खरातला जिल्हा न्यायालयाने सात दिवसांची म्हणजेच ८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. त्यामुळे बुधवारी नाशिकरोड कारागृहात रवानगी झालेल्या खरातचा दुसऱ्या गुन्ह्यात पुन्हा पोलिस कोठडीत पाहुणचार होणार आहे.

फेब्रुवारी २०२० ते मार्च २०२६ या काळात खरातच्या कॅनडा कॉर्नर येथील ‘ओकस प्रॉपर्टीज’ या कार्यालयात पीडितेवर वारंवार अत्याचार केल्याचा गुन्हा सरकारवाडा पोलिसांत दाखल आहे. खरातने तिला भविष्याबद्दल भीती दाखवून वेळोवेळी कार्यालयात बोलावून घेतले. तेथे तांब्याच्या बाटलीतील ‘मंतरलेले पाणी’ पाजून वारंवार अत्याचार केला. या शोषणातून पीडिता गर्भवती राहिली. तिला जबरदस्तीने गोळ्या देऊन गर्भपात घडवून आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. पीडितेने खरात याच्या कृत्यांना विरोध केला तेव्हा त्याने तिला ‘तुझ्या मुलांचे बरे-वाईट होईल. तुझे वाटोळे होईल,’ अशी भीती घालून गप्प केले.

धक्कादायक खुलासे

पोलिसांनी घटनास्थळावरून काही वस्तू जप्त केल्या आहेत. यामध्ये २२ रुद्राक्ष असलेला डबा, इंग्रजी मुळाक्षरे आणि अंक लिहिलेली एक पट्टी (काळ्या जादूसाठी वापरतात तशी), काळ्या रंगाचे भिंग आणि बाटलीमध्ये भरलेले हिरवट रंगाचे संशयास्पद पातळ द्रव्याचा समावेश असल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. अघोरी कृत्यांकरिता या वस्तूंचा वापर केल्याचा संशय तपास यंत्रणेने व्यक्त केला.

खरातने पीडितेकडून साडेबारा हजार रुपये घेऊन तिला एक बाटली दिली होती. त्यातील अर्धे औषध दुसऱ्या व्यक्तीला देण्यास सांगितले होते. हे औषध नेमके काय होते आणि त्याचा वापर कोणावर झाला, याचा तपास विशेष तपास पथकाने (एसआयटी) सुरू केला आहे. खरातने केवळ पीडितेचेच नाही, तर तिच्या आई-वडिलांचे आणि भावाचेही आधारकार्ड, पॅनकार्ड आणि फोटो तिच्याद्वारे मागवून घेतले. या कागदपत्रांद्वारे त्याने बेकायदेशीर आर्थिक व्यवहार केले का, असा संशय पोलिस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.

…म्हणून पुन्हा पोलिस कोठडी

सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी खरातला ‘मास्टरमाइंड’ संबोधत त्याने अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा दावा केला. संशयिताने पीडितेवर केवळ लैंगिक अत्याचार केला नाही, तर जादूटोणा आणि अघोरी कृत्यांद्वारे तिचे मानसिक खच्चीकरण केले. पीडितेला गर्भपातासाठी दिलेल्या गोळ्या आणि बाटलीतील ‘हिरवट’ रंगाचे संशयास्पद द्रव्य नक्की काय होते? त्याचा स्रोत शोधण्यासह या गुन्ह्यात त्याला आणखी कोणी मदत केली, त्याने पीडितेची मालमत्ता हडपली का, याचा सखोल तपास करण्यासाठी सात दिवसांची पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी सूर्यवंशी यांनी केली. बचाव पक्षातर्फे ॲड. सचिन भाटे यांनी पोलिस कोठडीस विरोध दर्शवला.

खरातच्या पत्नाविरुद्ध लूकआऊट नोटीस

खरात याची पत्नी कल्पना हिच्यावरदेखील फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. तेव्हापासून ती पसार झाली आहे. त्यामुळे तिच्याबाबत पोलिसांनी ‘लूकआउट’ नोटीस जारी केली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी घरी जाऊन तिला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याआधीच तिने पोबारा केला. ती देशाबाहेर पळून जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी तिला ‘लूकआउट’ नोटीस जारी केली. विमानतळ, बंदरे तसेच इतर प्रवेश-निर्गम ठिकाणी संबंधित यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *