मुंब्य्रामध्ये गोळीबाराचा थरार! बहिणीची छेड काढली म्हणून संतापलेल्या भावाकडून तिघांवर गोळीबार, एकाचा मृत्यू

ठाण्याजवळील मुंब्रा परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. मानलेल्या बहिणीची छेड काढली म्हणून भावाने तिघांवर गोळीबार केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार जयन शिवानंदन नायर असं या गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. जयन यांचं वय 51 वर्ष आहे. त्यांच्या बहिणीची  अब्दुल हसन शेख, अकबर अब्दुल शेख आणि समीर अहमद शेख यांनी छेड काढली. त्यांना याबद्दल माहिती मिळताच घरात असलेल्या बंदुकीने या तिघांवर अंदाधुंद गोळीबार केला. ज्यात एकाचा मृत्यू झाला आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना गुरुवारी सकाळी सुमारे 11.30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सुमनताई चव्हाण हिंदी प्राथमिक विद्यालयाजवळील बिस्मिल्ला चाळ, रूम क्रमांक 2 इथे हा सर्व धक्कादायक प्रकार झाला. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण आहे. जयन शिवानंदन नायर माजी लष्करी कर्मचारी असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, आरोपीने अंदाजे पाच गोळ्या झाडल्या ज्यात एकाचा मृत्यू झाला. या  गोळीबारानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. पण मुंब्रा पोलिसांनी तातडीने चौकशी करत आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून वापरलेलं शस्त्र जप्त केलं असून ते फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आलंय. आरोपीने पोलिसांना सांगितलं की, मानलेल्या बहिणीची छेड काढल्याच्या कारणावरून काही जणांशी त्याचा वाद झाला. हा वाद चिघळल्यानंतर संतापाच्या भरात नायरने गोळीबार केलाचे त्याने जबाबात सांगितलं आहे.

दरम्यान शाळेच्या जवळ ही घटना घडल्यामुळे पालक आणि स्थानिकांमध्ये भीतीदायक वातावरण आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. घटनेनंतर जखमींना तात्काळ मुंब्र्यातील कळसेकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान अकबर अब्दुल शेख यांचा मृत्यू झाला. बाकी दोघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *