ढग टाटून आले, गगनी काळोख संचारला, पुण्यात पावसाचा धुमाकूळ, जिकडेतिकडे पाणीच पाणी

पुण्यात भर उन्हाळ्यात मुसळधार पाऊस पडताना बघायला मिळत आहे. वातावरणात झालेल्या बदलांमुळे पुण्यात पावसाचा प्रकोप बघायला मिळतोय. पुणे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसासह गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. विशेष म्हणजे पुणे शहरात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडताना दिसतोय. दोन दिवसांप्रमाणे आजही पुणे शहरात पावसाने धुमाकूळ घातलेला बघायला मिळत आहे. पुण्यात दुपारनंतर आजसुद्धा वातावरणात बदल झाला. पुणे शहरात विविध भागांत काळोख संचारलेला बघायला मिळाला. यानंतर ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु झाला. या मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वारांना अनेक अचडणींना सामोरं जावं लागलं. तसेच चारचाकी वाहनचालकांनाही गाडीचे लाईट लावून मार्ग काढावा लागत आहे.

पुणे शहरातील अनेक भागांमध्ये काळोख बघायला मिळतोय. ढग दाटून आल्यामुळे हा काळोख निर्माण झाला आहे. तसेच मुसळधार पाऊस देखील पडत आहे. त्यामुळे रस्त्यावर फुटपाथच्या उंचीपर्यंत पाणी साचलं आहे. या परिस्थितीत रस्ता दिसावा यासाठी अनेक वाहनचालकांकडून लाईट लावून मार्ग काढण्यात येत आहे. रस्त्यावर एक ते दीड फूटापर्यंत पाणी भरलं आहे. पुणे शहरातील स्वारगेट, वारजे, शिवाजी नगर परिसर या ठिकाणी पाणी साचलं आहे. पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर पाणी साचलं आहे. तसेच शिवाजीनगर परिसरातही रस्त्यावर पाणी साचले आहे. ग्रामीण भागात काही ठिकाणी गारपीट झाली आहे. त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

हवामान विभागाचे शास्त्रज्ञ काय म्हणाले?

हवामान विभागाचे तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी प्रतिक्रिया दिली. “गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातील मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस पडत आहे. विदर्भात त्या मानाने कमी आहे. पण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस, वादळी वारे, विजांचा कडकडाट बघायला मिळतोय. दुपारच्या सुमारास असं वातावरण बघायला मिळतंय आणि ते संध्याकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत कायम राहतं. विंग डिस्कन्टीन्यूटी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अशाप्रकारे वातावरण निर्माण झालं आहे. पुढचे दोन ते तीन दिवस अशीच परिस्थिती असण्याची शक्यता आहे”, अशी माहिती के. एस. होसाळीकर यांनी दिली.

“पुण्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून गारपीट होताना बघतोय. आजदेखील पुणे, सातारा, जुन्नर येथे अशा प्रकारचं वातावरण आपण पाहतोय. काही ठिकाणी गारपीट आणि काही ठिकाणी मुरसळधार पाऊस पाहायला मिळतोय. दुपारनंतर मेघगर्जनेसह पाऊस पडतोय. पुण्यात दुपारच्या वेळी सर्वसाधारणपणे 35 ते 36 डिग्री तापमान असतं. ज्यावेळी दोन तास पाऊस पडून जातो त्यानंतर संध्याकाळी तापमान हे 29 अंशावर येतं. तापमानात हा विलक्षण बदल आहे. हा बदल शरीरासाठी अपायकारक असू शकतील. काही संवेदनशील व्यक्ती असतील त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो”, अशी प्रतिक्रिया होसाळीकर यांनी एका वृत्त वाहिनीला दिली.

“शेतकऱ्यांनी ज्यावेळी अचानक अशाप्रकारे पाऊस पडेल तेव्हा पक्क्या घराच्या शेडमध्ये जावून त्यांनी राहावं. झाड आणि विजेच्या खांब्याजवळ त्यांनी थांबू नये. वादळी वाऱ्यामुळे उभ्या पिकांचं नुकसान होऊ शकतो. त्यामुळे त्यांची काळजी घ्यावी लागेल”, अशीदेखील प्रतिक्रिया हवामान विभागाचे तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *