नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातच्या कारनाम्यांनी राज्य हादरले असतानाच, नवी मुंबईत महिलांच्या लैंगिक शोषणाचा असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इस्रोमध्ये शास्त्रज्ञ असल्याचे सांगून उच्चशिक्षित व उच्चभ्रू महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्या तरुणाला नवी मुंबई गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत.
काय आहे प्रकरण?
आदर्श म्हात्रे असे त्याचे नाव असून, त्याने डझनभर महिलांचे लैंगिक व आर्थिक शोषण केल्याचे समोर आले आहे. केवळ दहावी पास असलेल्या आदर्शने विवाह जुळवणारी संकेतस्थळे व अन्य सोशल मीडिया व्यासपीठांवर बनावट प्रोफाइल तयार केली होती. कधी इस्रोचा शास्त्रज्ञ, तर कधी ‘पीडब्ल्यूडी’मध्ये उच्चपदस्थ अधिकारी असल्याचे तो सांगायचा.
शरीरसंबंध आणि पैशांची लूट
राहणीमान मोठ्या अधिकाऱ्यासारखे ठेवून तो डॉक्टर, इंजिनीअर आणि बँक अधिकारी यांसारख्या उच्चशिक्षित महिलांना हेरायचा. लग्नाच्या भूलथापा देऊन त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणे आणि त्यानंतर पैशांची गरज असल्याचे भासवून लाखो रुपये उकळणे, ही त्याची ‘मोडस ऑपरेंडी’ होती.
राज्याच्या विविध भागात महिलांना फसवलं
आदर्श हा एका महिलेकडून लुबाडलेले पैसे दुसऱ्या महिलांसाठी वापरायचा. उरलेली रक्कम तो मौज मजा व चैनीच्या आयुष्यावर, तसेच कॅसिनोमध्ये उडवायचा. त्याने केवळ नवी मुंबईतच नव्हे, तर ठाणे, मुंबई, पिंपरी-चिंचवड, नागपूर आणि यवतमाळ अशा विविध शहरांतील अनेक महिलांना जाळ्यात ओढले असून, आत्तापर्यंत त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यांत ११ गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिस निरीक्षक सुनील शिंदे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक तपासाद्वारे आदर्शला अटक केली. या प्रकरणात फसवणूक झालेल्या महिलांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
