अमरावतीत तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी 18 वर्षीय महाविद्यालयीन तरुणी आणि तिच्या मित्राला आधी रस्त्यात अडवून मारहाण केली. यानंतर त्यांनी तरुणाला बांधून ठेवत, त्याच्यासमोर तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली आहे. 12 तासाच्या आता पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
फ्रेजरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भानखेडा जंगल परिसरात एका तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मित्रासोबत दुचाकीने फिरायला गेलेल्या तरुणीला काही अज्ञात आरोपींनी जंगलात ओढून नेले व तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून पाच जणांना अटक केली आहे.
आरोपींनी काढला व्हिडीओ
धक्कादायक बाब म्हणजे, आरोपींनी बलात्कार करताना व्हिडीओ शूट केला होता. घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर हा व्हिडीओ व्हायरल करु अशी धमकी त्यांनी तरुणीला दिली होती.
पोलिसांनी जंगल पिंजून काढलं, 12 तासात आरोपीला अटक
पोलिसांनी तपासाची चक्रं वेगाने फिरवली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मित्रासोबत मोपेडने परतत असताना पाच जणांनी त्यांना अडवलं. त्यांनी दोघांना ओढत जंगलात नेलं आणि पैशांसाठी मारहाण सुरु केली. पीडितेने तिच्याकडील 120 रुपये त्यांना दिले. मात्र यानंतर त्यांनी तिच्यावर बलात्कार केला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पथकांनी रात्रभर जंगल पिंजून काढलं,. यानंतर रविवारी पहाटेपर्यंत पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली. याप्रकरणी सामूहिक बलात्कार आणि लुटण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे
