अलिबाग तालुक्यातील उसर ते पोयनाड दरम्यान प्रस्तावित असलेल्या ‘मिसिंग लिंक’ रस्त्याच्या कामाला अखेर गती मिळण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. तब्बल दोन दशकांपासून रखडलेल्या या महत्त्वाच्या प्रकल्पाला आता नवजीवन मिळणार असून, भूसंपादनासाठी निधी मंजूर झाल्याने काम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. बैलखिंड मार्गे होणारी ही नवी जोडणी उसर-पोयनाड प्रवासाचे संपूर्ण गणित बदलणार आहे.
12 ते 15 किमी अंतर
सध्या उसरहून पोयनाडला जाण्यासाठी अलिबाग, कार्लेखिंड आणि पेझारी मार्गे सुमारे 30 किमीचा वळसा घालावा लागतो. मात्र या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पामुळे हे अंतर थेट 12 ते 15 किमीवर येणार आहे. परिणामी सध्या लागणारा पाऊण तासाचा प्रवास अवघ्या 10 ते 15 मिनिटांत पूर्ण होणार असून, नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या प्रकल्पाला गती मिळण्यामागे उसर परिसरात उभारला जात असलेला मोठा औद्योगिक प्रकल्प हे मुख्य कारण ठरत आहे. येथे उभारण्यात येणाऱ्या मेगा पॉलीमर प्रकल्पामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक हालचाली वाढणार आहेत. त्याचबरोबर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि 500 खाटांचे रुग्णालयही उभारले जात असल्याने भविष्यात वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने या रस्त्याला प्राधान्य दिले आहे.
औद्योगिक विकासाला चालना
सार्वजनिक बांधकाम विभागाने पोयनाड ते उसर दरम्यान बैलखिंड मार्गे रस्ता उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. भूसंपादन आणि वनविभागाच्या परवानग्यांसाठी सुमारे साडे सात कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. वनविभागाची अंतिम मंजुरी मिळताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. या नव्या रस्त्यामुळे केवळ अंतरच कमी होणार नाही, तर औद्योगिक विकासालाही मोठी चालना मिळणार आहे. अवजड वाहतुकीसाठी हा मार्ग एक सक्षम पर्याय ठरणार असून, पोयनाड-अलिबाग मार्गावरील ताण कमी होण्यास मदत होईल. तसेच वडखळमार्गे नागाव, चौलसारख्या पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या पर्यटकांसाठीही हा मार्ग अधिक सोयीचा ठरणार आहे.
वर्षानुवर्षे लालफितीत अडकलेला हा प्रकल्प आता मार्गी लागण्याच्या स्थितीत आला असून, स्थानिकांसह वाहनचालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. वेळ आणि इंधनाची बचत, वाहतूक कोंडीवर नियंत्रण आणि विकासाला चालना या तिन्ही बाबी साध्य करणारा हा रस्ता भविष्यात ‘गेमचेंजर’ ठरणार असल्याचे मानले जात आहे. एकूणच, उसर-पोयनाड ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पामुळे परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून, दोन दशकांची प्रतीक्षा अखेर संपण्याच्या मार्गावर आहे
