मधाचं पोळं बेतलं जीवावर! झाडावरुन पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, घटनेनं हळहळ

झाडावरून जमिनीवर पडून जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना बनेश्वर देवस्थानच्या हद्दीत गुरुवारी घडली.

काय घडलं?
विष्णू मारुती पवार (रा. वागजवाडी, ता. भोर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. देवस्थानच्या परिसरात वन विभागाच्या मोठ्या झाडांवर मधमाशांची मोठी पोळी आहेत. या संदर्भात देवस्थानने वन विभागाला पत्र दिले होते. त्यावर पोळे काढण्यासाठी शिवाजीनगर येथील मध संचालनालयाकडे संपर्क करावा, असे वन विभागाने कळवले होते.

दरम्यान कातकरी समाजाचे चार तरुण पोळे काढण्यासाठी झाडावर चढले होते. त्यातील विष्णू पाय घसरून जमिनीवर पडून गंभीर जखमी झाला. वन विभागाचे कर्मचारी व स्थानिकांनी त्याला नसरापूर येथील खासगी रुग्णालयात नेले. त्यानंतर पुण्यातील ससून रुग्णालयात नेले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

उरळीजवळ दुचाकीस्वार व्यावसायिकाचा मृत्यू
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर-सासवड रस्त्यावर उरळी देवाची परिसरात घडली. अपघातानंतर पसार झालेल्या ट्रकचालकाविरुद्ध फुरसुंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. राकेश अंबादास जन्नू (वय ५०, रा. कोंढवा) असे अपघाती मृत्यू झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांचे चुलतभाऊ राहुल जन्नू (वय ४२) यांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना २७ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास उरुळी देवाची येथील सोनाई हॉटेलसमोरच्या पेट्रोलपंपाजवळ घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार राकेश जन्नू हे हडपसर-सासवड रस्त्याने मंतरवाडीकडे निघाले होते. त्या वेळी भरधाव वेगात असलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला ठोकरले. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या राकेश यांना रुग्णालयात दाखल उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अपघातानंतर पसार झालेल्या ट्रक चालकाचा शोध घेण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *