जिल्ह्यातील पारनेर तालुका सध्या संतापाच्या ज्वाळांनी पेटला आहे. धार्मिकतेचा बुरखा पांघरून समाजात वावरत असलेल्या एका कथित कीर्तनकाराचा विकृत चेहरा उघडकीस आला आहे. या भोंदूने अल्पवयीन मुलीवर तब्बल पाच वर्षे अत्याचार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी आरोपी यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ (वय ३८) याच्याविरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
गावकऱ्यांचा संताप अनावर ; धर्माच्या नावाखाली घाणेरडा खेळ
मंगळवार १७ मार्च रोजी गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत आरोपी अण्णासाहेब गुंजाळ याच्या प्रतिमेला चपलेचा हार घालून त्याचे प्रतीकात्मक दहन करण्याचा निर्णय घेतला. तसेच गाव बंदची हाक देत या कृत्याचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. सरपंच नंदा भागाजी गावडे यांनी गावकऱ्यांच्या भावना व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. कीर्तनाच्या माध्यमातून समाजात विश्वास आणि प्रतिष्ठा मिळवलेल्या या व्यक्तीने त्याच विश्वासाचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे. समाजाला संस्कार शिकवणारा हा कीर्तनकार प्रत्यक्षात विकृत मानसिकतेचा असल्याचे उघड झाल्याने संताप अधिकच वाढला आहे.
वैयक्तिक आयुष्यही वादग्रस्त ; संपत्तीचा सुद्धा संशयास्पद खेळ?
आरोपी सिन्नर तालुक्यातील रहिवासी असून, त्याचे वैयक्तिक आयुष्यही संशयास्पद असल्याचे समोर आले आहे. एक पत्नी त्याला सोडून गेली आहे दुसरी पत्नी सध्या नऊ महिन्यांची गरोदर आहे. यापूर्वीही त्याच्यावर काही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे कीर्तनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात संपत्ती जमा केल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू असून, या संपत्तीच्या स्त्रोतांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
आता ग्रामस्थांना कारवाईची मोठी अपेक्षा
या घृणास्पद प्रकारामुळे वारकरी परंपरा आणि धार्मिक क्षेत्रावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून, पोलीस प्रशासनाकडून जलद तपासाची अपेक्षा व्यक्त होत आहे. धर्माच्या नावाखाली लपलेली ही विकृती उघड झाल्याने समाज हादरला असून, आता न्याय मिळतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
