मध्य रेल्वेच्या ताफ्यात नवी एसी लोकल, दररोज 100 फेऱ्या सुरू होणार; उन्हाळ्यात प्रवाशांना दिलासा

उन्हाच्या तडाख्याने त्रस्त झालेल्या मध्य रेल्वेवरील प्रवाशांना प्रवासासाठी आता एकूण १०० वातानुकूलित लोकल फेऱ्या उपलब्ध होणार आहेत. मध्य रेल्वेच्या ताफ्यात आणखी एक एसी लोकल दाखल होणार आहे. या लोकलच्या मदतीने मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर १४ एसी लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. यामुळे मे महिन्याच्या उकाड्यात एकूण १०० लोकल फेऱ्यांचा दिलासा रेल्वे प्रवाशांना मिळणार आहे.

मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच मुंबई परिसरात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. त्याचा परिणाम प्रवासावर जाणवू लागला आहे. रेल्वे स्थानकांतील बाटलीबंद पाणी असो वा स्थानकाबाहेरील ऊसाचा रस, ताक, शीतपेये, रेल्वे प्रवाशांची पावले तिकडे वळू लागली आहेत. दुपारच्या वेळेत उन्हाचा पारा चढत असल्याने गरम झळा सहन करत प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे.

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात दाखल होणार

मध्य रेल्वेने चेन्नईस्थित इंटिग्रल कोच फॅक्टरीकडे (आयसीएफ) नवीन एसी लोकलची मागणी केली होती. ही लोकल एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मुंबईत दाखल होणार आहे. एसी लोकलच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याणदरम्यान १२ ते १४ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. सामान्य लोकलच्या ऐवजी एसी लोकल धावतील. लवकरच त्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येतील, असे मध्य रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

सद्यस्थितीत मुख्य मार्गासह सीएसएमटी ते पनवेल या हार्बर मार्गावर एसी लोकल धावत आहे. मध्य रेल्वेच्या ताफ्यात सात एसी लोकल गाड्या आहेत. त्यांच्या मदतीने एकूण ९४ फेऱ्या चालवण्यात येतात. नव्या लोकलमुळे यात आणखी १२ ते १४ लोकल फेऱ्यांची भर पडणार आहे. यामुळे मध्य रेल्वेवर धावणाऱ्या एसी लोकल फेऱ्यांची संख्या १०० पार जाणार आहे. उन्हाळा लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने फेब्रुवारी महिन्यात १२ एसी लोकल फेऱ्या वाढवल्या होत्या. पश्चिम रेल्वेवर एकूण १३३ एसी फेऱ्या धावत आहेत.

‘फेऱ्या वेळेवर चालवा’

‘एसी लोकल फेऱ्यांची संख्या वाढवणे ही निश्चितच स्वागताची बाब आहे. मात्र फेऱ्या वाढवताना सध्याच्या एसी लोकल वेळेत चालवणे गरजेचे आहे. सीएसएमटी ते कल्याण आणि सीएसएमटी ते पनवेलदरम्यान धावणाऱ्या एसी लोकल सातत्याने विलंबाने धावत आहेत. एसी लोकल रद्द होणार असल्यास रेल्वे स्थानकांवर तशी उद्घोषणा करणे गरजेचे आहे. एसी तिकीट काढल्यावर एसी लोकल रद्द असल्यास त्याचा आर्थिक भुर्दंड प्रवाशांना सहन करावा लागतो,’ अशी प्रतिक्रिया एसी लोकलचे नियमित प्रवासी गणेश कर्वे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *