बरोबर 4 महिन्यांनी मुंबईवर ओढावणार समुद्री संकट; ‘हे’ 24 दिवस सागरी उलथापालथीनं शहरात नेमकं काय घडणार?

यंदाच्या वर्षीचा उकाडा आधीपेक्षाही अधिक तीव्र होत चालल्यानं आता मान्सून जरा लवकर यावा अशीच काहीशी आर्जव नागरिक करताना दिसत आहेत. प्रत्यक्षात मान्सूनच्या आगमनास साधारण तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असतानाच मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा मात्र त्यासाठी सज्ज झाली आहे. दरवर्षी शहरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसानं हजेरी लावली, की ‘मुंबईची तुंबई झाली’ असं सांगणारी अनेक वृत्त पाहायला मिळतात. यंदा ही परिस्थिती तुलनेनं कमी प्रमाणात सामोरी यावी यासाठी आतापासूनच पालिका कामाला लागली आहे. इथं मान्सूनपूर्व कामं आवरती घेण्याकडे पालिकेचा भर असातनाच तिथं आता मुंबईला सतर्क करणारा इशारासुद्धा जारी करण्यात आला आहे.

चार महिन्यांनी काय घडणार? 

राज्यात अवकाळी सक्रिय असला तरीही प्रत्यक्ष वरुणराजाच्या आगमनास तीन महिने शिल्लक असताना, शहरात यंदा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. जून ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये शहरात जोरदारस पाऊस बरसणार असून यादरम्यान समुद्राला तब्बल 24 दिवस भरती असेल असा अंदाज आहे. जून ते ऑगस्ट या काळात सर्वाधिक मोठी भरती शहराला धडकणार असून, 16 जुलैला तब्बल 4.89 मीटर उंचीपर्यंतच्या लाटा किनाऱ्याला धडकणार असल्याचा इशारा आहे.

लाटांची ही संभाव्य उंची पाहता त्यासाठी पावसाळ्यादरम्यान नागरिकांना सतर्कता बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय भरती काळात नागरिकांना किनाऱ्यांजवळ न जाण्याचाही इशारा देण्यात आला आहे. दरवर्षी पावसाळ्यात मुंबईच्या सखल भागात पाणी साचण्याच्या घटना घडतात. यंदाही समाधानकारक पाऊस आणि समुद्राच्या भरतीवेळी मुंबई जलमय होण्याचा धोका असल्यामुळं खबरदारी घ्यावी लागणार हे स्पष्ट आहे.

सहसा पावसाळ्यात भरतीवेळी समुद्राच्या लाटा 4 मीटर उंचीपेक्षाही जास्त असतात, ज्यामुळं सावधगिरीचा इशारा जारी करण्यात येतो. त्यातच पावसाचं पाणी समुद्रात सोडणाऱ्या पंपिंग स्टेशनचे दरवाजे, सांडपाणी सोडण्यासाठी वापरण्यात येणारे फ्लड गेट्स बंद ठेवण्यात येतात. ज्यामुळं सखल भागात पाणी साचतं.

कोणत्या दिवशी येणार मोठी भरती? 

  • जून – 16 आणि 17 जून रोजी मोठी भरती यएणार असून, अनिक्रमे दुपारी 1.05 वाजता 4.87 मीटर आणि दुपारी 1.55 वाजता 4.86 मीटर उंच लाटा उसळतील.
  • जुलै- या महिन्यात 6 दिवस मोठ्या भरतीचे असून, 15 जुलै रोजी 12.51 वाजता दुपारी 4.85 मीटर आणि 16 जुलै रोजी दुपारी 1.36 वाजता 4.89 मीटरच्या लाटा उसळतील.
  • ऑगस्ट- भरतीचे पाच दिवस अतिदक्षतेचे असतील. ज्यामध्ये 14 ऑगस्ट रोजी दुपारी 1.07 वाजता 4.83 मीटरची सर्वात मोठी भरती असेल.
  • सप्टेंबर – या महिन्यात सात, दिवस मोठ्या भरतीचे असूनन, 11 सप्टेंबरला सर्वात मोठी भरती असेल. जेव्हा दुपारी 12 वाजता 4.65 मीटर उंचीच्या लाटा उसळतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *