DCM शिंदेंच्या नावानं बनवलं पिवळं रेशन कार्ड; नाव, गाव सारंकाही हुबेहूब… कुठं सक्रिय आहे टोळी?

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे बनावट रेशनकार्ड अर्थात शिधापत्रिका बनवण्यात आल्याची माहिती नुकतीच समोर आली. शिंदेंच्या नावे पिवळे रेशन कार्ड तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरात समोर आला. माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत हे कार्ड दाखवून खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर, सदर रेशन कार्ड पूर्णपणे बोगस असल्याचे निष्पन्न झाले असून, याप्रकरणी अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांनी सिटी चौक पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दोन दिवसांपूर्वी इम्तियाज जलील यांनी एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बनावट आधार कार्डसह इतर बनावट कागदपत्रे तयार करून, शासकीय योजना लाटण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे आरोप केले होते. या बनावट रेशन कार्डातील तपशील, त्याची आखणी पाहिली असता मूळ रेशनकार्डाप्रमाणंच ते तयार करण्यात आलं असून अशी रेशनकार्ड बनतात कुठे आणि ती कोण बनवून देतं असे अनेक प्रश्न यामुळं उपस्थित करण्यात येत आहेत. प्राथमिक माहितीनुसार हे रेशनकार्ड कोणत्याही शासकीय कार्यालयातून तयार करण्यात आलं नसून ते बनावट असल्याचं निष्पन्न झाल्यानं बनावट रेशनकार्ड बनवणाऱ्या टोळक्याचा शोध घेण्याची मागणी जलील यांच्याकडून करण्यात येत आहे.

माहितीचा तपशील जसाच्या तसा… 

शिंदेंच्या नावे समोर आलेल्या या बनावच शिधापत्रिकेवर देण्यात आलेली माहिती ही एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबासंदर्भातील असून यामध्ये पत्नी- लता, मुलगा – श्रीकांत, सून- वृषाली, नातू- रुद्रांश अशी नावंही असल्याचं सांगण्यात आलं. महत्त्वाचं म्हणजे हे रेशनकार्ड हस्तलिखित स्वरुपातील असून, गेल्या दोन वर्षांपासून तर रेशनकार्ड ऑनलाईन पद्धतीनं दिलं जात आहे, ज्यामुळं आता या प्रकरणी तपास करत ये रॅकेट नेमकं कुठेकुठे सक्रिय आहे आणि राज्यात अशी किती रेशनकार्ड बनावट आहेत याचाच शोध घेण्यातं आव्हान यंत्रणांपुढे असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *