मुंबईत मार्चमधील तिसरी उष्णतेची लाट! दोन दिवस पारा पुन्हा चढणार; हवामान विभागाचा इशारा

गेले दोन दिवस मुंबईतील तापमानात 5-6 अंश सेल्सिअसने घट झाल्यानंतर आता पुन्हा उन्हाचा तडाखा वाढणार आहे. हवामान विभागाने मुंबईतील काही ठिकाणांना शुक्रवार आणि शनिवारी उष्णतेची लाट येण्याच्या इशारा दिला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस शहरातील तापमान वाढणार आहे. 13 आणि 14 मार्च दरम्यान मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये उष्ण व दमट वातावरणासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

मार्चमधील तिसरी उष्णतेची लाट

गुरूवारी सांताक्रूझमध्ये 32 -33 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवलं गेलं होतं. पण शुक्रावरी हे तापमान पुन्हा वाढणार आहे. मार्च महिना सुरू झाल्यापासून मुंबईमधील ही तिसरी उष्णतेची लाट आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या एप्रिल आणि मे महिन्यात हवामान नेहमीपेक्षा अधिक उष्ण असणार आहे.

गेल्या 12 दिवसांतली शहरातील ही तिसरी उष्णतेची लाट असेल. 5, 9 आणि 10 मार्च रोजी यापूर्वी शहरात हीट व्हेवची स्थिती निर्माण झाली होती. 10 मार्च रोजी, तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसवर पोहचला होता. 12 मार्चला हा पारा उतरला होता. सांताक्रूझमध्ये 33.1 सेल्सिअस तर कुलाब्यामध्ये 32.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. किमान तापमान गेले काही दिवस स्थिर होतं.

तापमान वाढीचं कारण काय?

हवामान निरीक्षक अभिजीत मोडक यांनी या वाढत्या तापमानाबद्दल माहिती दिली. ‘बुधवारी तापमानात थोडी घट झाली होती पण गुरूवारपासून पुन्हा उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण होणार आहे. मुंबईतील उपनगरांपासून कोकण किनारपट्टीपर्यंत उष्णतेचा लाटेचं संकट निर्माण होणार आहे. विक्रोळी, ठाणे आणि नवी मुंबईसारख्या भागांमध्ये सर्वाधिक परिणाम होईल. स्वतंत्र हवामान निरीक्षक अथ्रेया शेट्टी यांच्या अंदाजानुसार प्रत्यक्षात मुंबईमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता फार कमी आहे. अरबी समुद्रात अँटी सायक्लेन कमकुवत झालं असून यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाऱ्यामुळे तापमान वाढण्याची शक्यता आहे. यामुळे हवामान विभागाने इशारा दिला असून प्रत्यक्षात उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता कमी असल्याची त्यांनी माहिती दिली आहे.

दरम्यान, मराठवाडा आणि विदर्भात हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह पावासाचा इशारा दिला आहे. यामुळे रविवारपर्यंत या भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. मुंबई आणि कोकणात सध्या पावसाचा इशारा नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *