शेजारणीला ‘आई’ म्हटले म्हणून पीडित 3 वर्षांच्या मुलीला तिच्या दत्तक आईने जबर मारहाण केली आहे. ती मुलगी वारंवार शेजारी राहणाऱ्या महिलेला ‘आई’ किंवा ‘मम्मी’ म्हणून हाक मारत असे. ही गोष्ट सहन न झाल्यामुळे त्या दत्तक आईने मुलीला खूप विचित्र पद्धतीने मारहाण केली आहे. आपली मुलगी शेजारच्या महिलेला ‘आई’ का म्हणते, या रागातून आणि मत्सरातून आरोपी महिलेने जिचे नाव दिलशान शेख हिने चिमुरडीवर अमानुष अत्याचार केले. हा प्रकार भिवंडीत घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
अमानुष अत्याचाराचे स्वरूप
त्या दत्तक आरोपी महिलेने रागाच्या भरात चिमुरडीचे कपडे काढून तिला मारहाण केली. एवढेच नाही तर तिच्या डोळ्यात आणि तोंडात मिरची पूड तसेच माती/घाण कोंबली. एवढ्यावर ही महिला थांबली नाही तर तिने त्या मुलीला भिंतीवर आदळले. व्हिडिओमध्ये दिसत असल्यानुसार, महिलेने मुलीचे डोके भिंतीवर आदळले आणि तिला जीवघेणी मारहाण केली.
पोलिस कारवाई आणि सद्यस्थिती
या अमानुष कृत्याचा व्हिडिओ एका जागरूक शेजाऱ्याने चित्रित करून सोशल मीडियावर व्हायरल केला होता. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पडघा पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवून बापगाव येथून मुलीची सुटका केली. पीडित मुलीला उपचारांसाठी आणि सुरक्षेसाठी बाल निरीक्षणगृहात पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपी महिला (दिलशान शेख), तिचा पती (शौकत शेख) आणि मुलीला दत्तक देणारा उमेश येवले यांच्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. मुलगी दत्तक घेण्याची प्रक्रिया कायदेशीर होती का आणि कोणत्या परिस्थितीत तिला दत्तक दिले गेले, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
बिहारमध्ये धक्कादायक प्रकार
बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यात एक अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना घडली आहे. 8 वीमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात तिचाच प्रियकर आणि त्याच्या मित्राचा सहभाग असल्याची माहिती तपासात समोर येत आहे. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. मुलीचा मृतदेह गावाजवळील बांबूच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर गावात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
