मुंबईकरांना या आठवड्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) अधिकृत सूचना जारी करत सांगितलं आहे की, येत्या मंगळवारी 10 मार्च 2026 मुंबईतील काही भागामध्ये 24 तासांसाठी पाणीपुरवठा होणार नाहीय. गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (GMLR) प्रकल्पांतर्गत पाइपलाइन टाकण्याचे आणि जोडण्याचे कामासाठी हा पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. ही पाणीकपात मंगळवारी 10 मार्च 2026 सकाळी 9 वाजेपासून बुधवारी 11 मार्च 2026 सकाळी 9 वाजेपर्यंत असणार आहे.
मुंबईतील कोणत्या भागात असणार 24 पाणीपुरवठा बंद?
बीएमसीने माहिती दिली आहे की, गोरेगावच्या पी-पूर्व आणि पी-दक्षिण वॉर्डमधील अनेक भागात पाणीपुरवठावर परिणाम होणार आहे. गोरेगाव पूर्वेतील दादासाहेब फाळके फिल्म सिटी ते दिंडोशी कोर्ट पर्यंत उड्डाणपूल आणि प्रवेश रस्त्याच्या बांधकामासाठी 750 मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीचे वळण आणि कनेक्शनच्या कामासाठी पाणीपुरवठावर परिणाम होणार आहे.
या भागात पाणी येणार नाही!
पी-साउथ वॉर्ड अंतर्गत येणाऱ्या संतोष नगर, फिल्म सिटी रोड, सॅटेलाइट टॉवर आणि हेब्बल पाडा यासारख्या भागात मध्यरात्री 12 ते पहाटे 3 वाजेपर्यंतच पाणी असणार आहे. पण उर्वरित 21 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दरम्यान, पी-पूर्व वॉर्डातील शिवशाही प्रकल्पात रात्री 11:45 ते पहाटे 5:45 पर्यंत नियमित पुरवठा करण्यात येईल. श्री कृष्ण नगरमध्ये पहाटे 3:30 ते सकाळी 9 वाजेपर्यंत नियमित पुरवठा असेल. मोहन गोखले रोड आणि साई मार्ग यासारख्या भागात पाणीपुरवठा करण्यात येईल पण दाब खूपच कमी राहणार आहे.
गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पाचे महत्त्व
जीएमएलआर प्रकल्प हा मुंबईतील चौथा मोठा जोड रस्ता राहणार आहे. ज्यामुळे पश्चिम आणि पूर्व उपनगरांमधील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत मिळणार आहे. उड्डाणपूल आणि पाईपलाईनचे काम या मोठ्या प्रकल्पाचा भाग असून जे वेळेवर पूर्ण करणे शहराच्या भविष्यातील वाहतूक परिस्थितीसाठी आवश्यक मानली गेली आहे. बुधवारी सकाळपर्यंत पाणीपुरवठा पूर्ववत व्हावा यासाठी दुरुस्तीचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात आल्याचे आश्वासन बीएमसीच्या पाणी विभागाने दिलं आहे.
