तहान लागल्याचा बहाणा करून डिलिव्हरी बॉयने महिलेला पाणी आणायला सांगितले. पाण्याचा ग्लास घेताच ग्राहक महिलेच्या हाताला स्पर्श करून “तू खूप सुंदर दिसतेस” असे म्हणून डिलिव्हरी बॉयने ग्राहक तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकारणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणीने घरासाठी काही साहित्य मागवण्यासाठी ऑनलाईन डिलिव्हरी सेवा वापरली होती. ६ मार्च रोजी सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास संबंधित डिलिव्हरी बॉय तिच्या घरी पार्सल घेऊन आला. तरुणीने दरवाजा उघडून पार्सल स्वीकारले. त्यानंतर डिलिव्हरी बॉयने पिण्यासाठी पाणी मागितले. मानवतेच्या नात्याने तरुणीने त्याला पाणी दिले. मात्र त्याच वेळी डिलिव्हरी बॉयने मर्यादा ओलांडत तिच्या हाताला स्पर्श केला आणि “तू खूप सुंदर दिसतेस” असे म्हणत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तरुणी घाबरून गेली.
त्यावेळी घरात तिचे लहान बाळ आणि सासूही उपस्थित होते. हा प्रकार घडल्यानंतर तरुणीने लगेचच आपल्या पतीला सर्व सांगितले. त्यानंतर दोघांनी मिळून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली.
डिलिव्हरी बॉयची ओळख
तक्रारीनंतर पोलिसांनी ॲपमधील डिलिव्हरीची माहिती तपासून संबंधित डिलिव्हरी बॉयची ओळख पटवली. श्रीधर कांबळे असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे काही फुटेज सीसीटीव्हीतही आढळल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, आरोपीचा शोध घेण्यासाठी शिवाजीनगर पोलिसांनी तपास सुरू केला असून पुढील कारवाई केली जात आहे.
सर्वसामान्य चिंतेत
घरपोच सेवा देणाऱ्या ॲप्समुळे अनेकांची कामे सोपी झाली आहेत. मात्र त्याच सेवेमधून असा धक्कादायक प्रकार पुण्यात घडल्यामुळे पुणेकरांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. माणसांवर विश्वास ठेवायचा की नाही? गरजू व्यक्तींवर विश्वास ठेऊन मदत करायची की नाही? आणि ऑनलाईन सेवांचा वापर करायचा की नाही? असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात घर करू लागले आहेत.
