शहरात आत्महत्येच्या घटनांचे सत्र सुरुच असून, गंगापूर रोड परिसरातील डी. के. नगर भागात राहणाऱ्या प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ञ डॉ.मनिषा जेजुरकर (वय 40) यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातील मनोविकार तज्ञ डॉ. निलेश जेजुरकर यांच्या त्या पत्नी होत्या.
कारण अद्याप अस्पष्ट
पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मयत डॉ.मनिषा निलेश जेजुरकर या गंगापूर रोडवरील ‘रेवती ब्ल्यु अपार्टमेंट’, डी. के. नगर येथे वास्तव्यास होत्या. काल शुक्रवारी रोजी सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी खिडकीच्या लोखंडी रॉडला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला. घटनेची माहिती मिळताच त्यांना बेशुद्ध अवस्थेत दुपारी 2:40 वाजता उपचारासाठी जिल्हा रुग्णालय येथे येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, रुग्णालयातील डॉ. श्रावणे यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नसून गंगापूर पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. तर या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
