प्रेमाच्या आणाभाका घेत जिथं अनेकदा जोडपी आयुष्यभराची साथ देण्यासाठी कटीबद्ध राहतात, तेच प्रेम जीवनाच्या एका वळणावर अनपेक्षित कृत्यसुद्धा करवून घेतं. नागपूरमध्ये घडलेल्या एका घटनेतून, प्रेमाच्या नात्याची अशीच एक बाजू पाहायला मिळाली, जिथं पतीच्या साथीनं एका महिलेनं पूर्वाश्रमीच्या प्रियकराला संपवण्याची घटना घडली आहे.
वसाढवळ्या हत्येचा थरार…
नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा परिसरात दिवसाढवळ्या हत्येचा थरार घडल्याचं पाहायला मिळालं आणि परिसरात एकच खळबळ माजली. खापरखेडा परिसरातील कोराडी रोडवर पती पत्नीकडून एका तरुणाची धारदार चाकूने हत्या करण्यात आली. सागर वानखेडे असं मृत तरुणाचं नाव असून आरोपी पत्नी सोनाली गजभिये आणि पती राजू गजभिये यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
सोनाली आणि सागरचे लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते, मात्र सोनालीने राजू गजभियेशी लग्न केलं आणि त्यांना दोन मुलंही आहेत. परंतु सोनाली आणि सागर लग्नानंतरही संपर्कात होते. राजु गजभिये यांनी खापरखेडा पोलीस ठाण्यात त्यासंदर्भातील तक्रार केली होती. सागर होळीनिमित्त पुण्याहून गावी आला होता. यादरम्यान त्याने सोनालीला इंस्टाग्रामवरून भेटण्यासाठी मॅसेज केला. गुरुवार 5 मार्च, 2026 रोजी सकाळी दहा वाजता सागर आणि सोनाली एकाच बाईकवरून गेले असता सोनालीने रस्त्यात मुद्दाम तिची पर्स खाली टाकली.
बाईक थांबताच असं काही घडलं की…
सागरने बाईक थांबवताच सोनालीने सोबत नेलेल्या चाकूने त्याच्यावर दोन वार केले. त्यानंतर राजू गजभिये पाठलाग करत तिथे पोहचला त्यानेही सागरवर अनेक वार केले. यामध्ये गंभीररित्या जखमी झालेल्या सागरचा जागीच मृत्यू झाला. सदर धक्कादायक घटनेनंतर आरोपी पती – पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, या प्रकरणी कोराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत पोलिसांकडून पुढील तपास सुरू करण्यात आला.
