बापाच्या घामाचं चीज झालं! UPSC परीक्षेत शेतकरी पुत्राचा डंका, छ.संभाजीनगरमधील प्रज्वलची मोठी झेप

ग्रामीण भागातील मातीचा सुगंध आणि कष्टाची ओढ असलेल्या एका तरुणाने देशातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या परीक्षेत आपल्या यशाचा झेंडा रोवला आहे. गंगापूर तालुक्यातील शंकरपूर येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलाने यूपीएससी परीक्षेत 434वी रँक मिळवून प्रशासकीय सेवेचे आपले स्वप्न सत्यात उतरवले आहे. प्रज्वलचे हे यश म्हणजे केवळ एका तरुणाची प्रगती नसून, शेतात राबणाऱ्या एका बापाच्या कष्टाला मिळालेली ही सर्वात मोठी पावती आहे. प्रज्वल राजू पोळ असं यूपीएससी परीक्षेत 434वी रँक मिळवलेल्या तरुणाचे नाव आहे.

प्रज्वलचं गाव आणि कौटुंबिक पार्श्वभूमी

प्रज्वल पोळ हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शंकरपूर ता. गंगापूर येथील मूळ रहिवासी आहे. त्याचे वडील राजेंद्र पोळ हे व्यवसायाने शेतकरी आहेत. शेतीसोबतच ते लासूर बाजारपेठेतील कृषी सेवा क्षेत्रातील एक ज्येष्ठ व्यापारी म्हणूनही ओळखले जातात. एका शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे प्रज्वलला कष्टाची आणि संघर्षाची जाणीव बालपणापासूनच होती. प्रज्वलचे कुटुंब मध्यमवर्गीय असून त्याचे वडील शेती आणि व्यापाराच्या माध्यमातून घराचा गाडा हाकतात. ग्रामीण भागातील वातावरण आणि शेतीवर अवलंबून असलेल्या परिस्थितीमध्ये यूपीएससीसारख्या कठीण परीक्षेची तयारी करणे हे एक मोठे आव्हान होते. मात्र, राजेंद्र पोळ यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी आणि स्वप्नांसाठी सदैव पाठबळ दिले. प्रज्वलनेही घरच्या परिस्थितीचे भान राखून कोणत्याही महागड्या खासगी क्लासेसचा अट्टहास न धरता, स्वतःच्या जिद्दीवर अभ्यास पूर्ण केला.

आयकर अधिकारी म्हणून निवड

प्रज्वलचा हा प्रवास जिद्द आणि सातत्याने भरलेला आहे. त्याने कोणत्याही मोठ्या खासगी क्लासचे साहाय्य न घेता, केवळ स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवला. वयाच्या 25व्या वर्षी प्रज्वलने मिळवलेले हे यश ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांसाठी आशेचा नवा किरण ठरत आहे. त्याच्या या घवघवीत यशामुळे आता त्याची भारतीय महसूल सेवा म्हणजेच आयकर अधिकारी या पदावर निवड निश्चित मानली जात आहे.
आपल्या यशाबद्दल बोलताना प्रज्वल भावूक होतो. त्याने अभ्यासाचे मोजके तास मोजण्याऐवजी अभ्यासाची गुणवत्ता आणि सातत्यावर लक्ष दिले. दररोज 9 ते 10 तास मनापासून अभ्यास करताना त्याने दोन स्तरांवर नियोजन केले होते. सुरुवातीला अभ्यासक्रम आणि मागील वर्षांचे प्रश्न नीट समजून घेतले आणि त्यानंतर नियमित रिव्हिजन आणि उत्तरलेखनाच्या जोरावर स्वतःला सिद्ध केले. पुस्तके आणि मागील वर्षांच्या प्रश्नांच्या सरावावर त्याने सर्वाधिक भर दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *