अलीकडे आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे. अशीच एक दुर्दैवी घटना सिंधुदुर्गमध्ये घडली आहे. 22 वर्षीय तरुणाने आपल्या वाढदिवसाच्या दिवशीच आपलं आयुष्य संपवल्याची मोठी घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात घडली आहे. आर्यन सुभाष रवंदे (वय 22) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे.
आत्महत्या का केली?
महागडा नवीन मोबाईल खरेदीसाठी आईने पैसे न दिल्याच्या रागातून जामसंडे सहकारनगर येथील आर्यन सुभाष रवंदे याने आपल्या वाढदिवसादिवशीच राहत्या घरातील हॉलमध्ये गळफास लावून घेतला. त्याला तात्काळ जामसंडे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना तो मयत झाला. ही घटना गुरुवारी 5 मार्च रोजी रात्री 11.20 वाजेच्या सुमारास घडली. घटनेची नोंद देवगड पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे
पोलिसांनी काय माहिती दिली?
आर्यन हा आईसमवेत जामसंडे सहकारनगर येथे स्वत:च्या मालकीच्या घरात राहत होता. त्याची आई मोलमजुरीची काम करते. तर आर्यनही वेल्डींगच्या कामासह इतर मोलमजुरीची कामे करून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आईला आर्थिक हातभार लावत असे. आर्यनचा 5 मार्च गुरुवारी रोजी वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त महागडा नवीन मोबाईल खरेदी करण्यासाठी त्याने आपल्या आईकडे पैशांची मागणी केली. परंतु आईने पैसे देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने त्याने राहत्या घराच्या हॉलमध्ये स्वतःला गळफास लावून घेतला. लक्षात येताच त्याच्या आईने नजीकच्या ग्रामस्थांच्या मदतीने आर्यनला जामसंडे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
