खासगी कामासाठी निघाले, घरी परतताना चौकोनी कुटुंबावर काळाची झडप; आई-लेकीचा जागीच करुण अंत

बारामती-पारवडी मार्गावर काल रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पती व दोन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयूर कोकणे हे पत्नी रूपाली कोकणे, पाच वर्षांची मुलगी सानवी आणि दोन वर्षांचा मुलगा यांच्यासह दुचाकीवरून बारामतीहून पारवडीकडे जात होते.

आई-लेकीचा जागीच अंत

दरम्यान, बारामती-कटफळ-पारवडी मार्गावर परीट वस्तीजवळ खडकीकडून बारामतीच्या दिशेने येणाऱ्या एका चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत पाच वर्षांची सानवी मयूर कोकणे व तिची आई रूपाली मयूर कोकणे यांचा जागीच मृत्यू झाला. तर मयूर कोकणे आणि त्यांचा दोन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाले. घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले.

वाहन सोडून पलायन

अपघातानंतर चारचाकी वाहन चालकाने गाडी घटनास्थळीच सोडून पलायन केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, या अपघातामुळे बारामती-पारवडी मार्गावरील वाहतूक किती धोकादायक झाली आहे, याबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *