वहिनीला चहा करायला सांगून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या ४३ वर्षांच्या चुलत दीराला दहा वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा बारामती अतिरिक्त सत्र न्यायालयाने ठोठावली. आरोपीविरोधात पीडितेने नोंदविलेली साक्ष विश्वासार्ह व ठोस असून, तिला पती आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष व न्यायवैद्यक तपासणी अहवालाने दुजोरा दिला आहे. त्यामुळे केवळ पीडितेच्या विश्वासार्ह साक्षीच्या आधारेही आरोपीला दोषी ठरविता येऊ शकते, या सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचा दाखला देऊन अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. डी. शेळके यांनी हा निकाल दिला.
काय घडलं नेमकं?
पीडितेने या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार, आरोपीविरोधात भारतीय दंड संहितेनुसार अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. नात्याला काळिमा फासणारी ही घटना १४ जून २०२४ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास बारामती येथील प्रगतीनगर परिसरात पीडितेच्या घरात घडली.
पीडितेचे पती सुरक्षारक्षक आहेत, तर आरोपी कामगार आहे. घटनेच्या दिवशी दुपारी दीड वाजता आरोपी पीडितेच्या घरी आला. त्या वेळी पीडितेचे पती कामावर गेले होते. पीडितेने आरोपीला चहा दिला. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास पीडिता पुन्हा चहा करण्यासाठी गॅसजवळ गेली असता, आरोपीने तिच्यावर अत्याचार केले. या घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही पीडितेला दिली. त्यामुळे घाबरलेल्या पीडितेने पतीच्या कामाच्या ठिकाणी धाव घेतली. पतीला फोन करून घडलेला प्रकार सांगितल्यानंतर बारामती शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
आरोपीकडून पीडितेवर दबाव
या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील के. एस. नवले यांनी काम पाहिले. त्यांनी सरकार पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडितेची साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपीने खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आल्याचा बचाव केला. मात्र, आरोपीच्या परिचयाचे लोक पीडितेला साक्ष फिरविण्यासाठी दबाव टाकत असल्याचे पीडितेच्या पतीने न्यायालयात सांगितले. गुन्ह्याचे स्वरूप व गांभीर्य आणि आरोपीने एका असहाय महिलेविरुद्ध गुन्हा केला आहे, ही बाब लक्षात घेऊन त्याला शिक्षा देणे न्याय्य ठरेल, असे नमूद करून न्यायालयाने आरोपीला शिक्षा ठोठावली; तसेच पीडितेच्या पुनर्वसनासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला भरपाई देण्याचा आदेशही दिला.
