विमान अपघात अन् 16 लाख रुपयांचं चहापानाचं बिल; जनतेच्या पैशातून केला खर्च

 राज्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी सुरु असतानाच दुसरीकडे शेजारच्या गुजरातमध्ये 2025 साली झालेल्या विमान अपघातासंदर्भातील एका पेमेंटमुळे खळबळ उडाली आहे. गुजरातमधील अहमदाबाद विमानतळाजवळ 12 जून 2025 रोजी झालेल्या एअर इंडियाच्या भीषण विमान अपघातानंतर घटनास्थळी सफसफाई आणि मृतदेहांचा शोध घेण्यासाठी बोलवण्यात आलेल्या टीमच्या खर्चाचा थक्क करणारा आकडा समोर आला आहे. या टीममधील सदस्यांच्या केवळ चहापानासाठी केलेल्या खर्चाचं पेमेंट नुकतेच अमहदाबाद महानगरपालिकेच्या स्थायी समितीने मंजूर केलं आहे. या कर्मचाऱ्यांच्या चहापानावर तब्बल 16 लाख रुपये खर्च झाले आहेत.

कोणासाठी झाला एवढा खर्च

अहमदाबादमधील बीजे मेडिकल कॉलेजच्या आवारातील दुर्घटनास्थळाबरोबरच एकूण चार जागी वेगवेगळी मदतपथकं तैनात करण्यात आलेली. विमान अपघातानंतर घटनास्थळी मदतीसाठी आलेलेले सामाजिक संघटनांचे अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवकांचा समावेश असलेल्या पथकांना चहा, नाश्ता, पाण्याच्या बाटल्या, अमूल दूध आणि बिस्किटे पुरवण्यासाठी हा खर्च झाल्याचं सांगण्यात आलं आहे. या सर्वांच्या चहापनासाठी आणि नाश्त्यासाठी तब्बल 16 लाख 74 हजार 405 रुपयांची बिलं संबंधित विभागांनी सादर केली. ही बिलं मंजूर करत या खर्चाच्या मोबदल्यात आता 16 लाखांहून अधिक रुपयांचा निधी महानगरपालिकेकडून मंजूर करण्यात आला आहे. मात्र फक्त चहापानासाठी एवढा लाखो रुपयांचा खर्च झाल्यांचं पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं असून जनतेच्या करातून उभा केला जाणारा पैसा अशाप्रकारे वापरला जात असल्याबद्दल दबक्या आवाजामध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

विमान अपघातासंदर्भातील ताजा खुलासा

अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया फ्लाइट एआय-171 च्या बोइंग 787-8 विमान अपघातात 260 जणांचा मृत्यू झाला होता. यापैकी 241 प्रवासी होते. या अपघातासंदर्भात नुकताच एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांमध्ये तांत्रिक दोष वाढल्याची माहिती समोर आली आहे. जानेवारी 2026 मध्ये प्रति एक हजार उड्डाणांमागे 1.09 दोष नोंदवले गेलेत. डिसेंबर 2024 मध्ये हाच आकडा 0.26 इतका होता. 17500 हून अधिक उड्डाणांमध्ये 23 घटनांमध्ये यंत्रणांमध्ये दोष आढळून आले असून त्यापैकी 21 घटनांची चौकशी सुरू आहे. या दोषांमध्ये प्रामुख्याने फ्यूल कट-ऑफ स्विचच्या मुद्दाचा समावेश आहे.  याचसंदर्भातील फेब्रुवारी महिन्यात एक विमान या स्विचच्या समस्येमुळे अचानक उतरवण्यात आले होते.

विशेष म्हणजे एकीकडे ही माहिती समोर आलेली असतानाच अहमदाबादमधील अपघातासाठी वैमानिकाला दोषी ठरवत त्यानेच हा वादग्रस्त फ्युएल स्विच बंद केल्याने अपघात झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे खरोखरच वैमानिकाने हा स्विच बंद केलेला की तांत्रिक अडचणीमुळेच विमान पडलं अशी शंका पुन्हा उपस्थित केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *