‘इस्त्रायलकडून 100 कोवळ्या मुली ठार, मोदी मूकबधीर होऊन का बसलेत?’, राऊतांची विचारणा, मदतीची करुन दिली आठवण

इराणच्या सुप्रीम लीडरचं निधन झाल्यानंतर शोक व्यक्त करणं भारताचं कर्तव्य आहे. नरेंद्र मोदी शोक व्यक्त करण्यास का घाबरत आहेत? अशी विचारणा खासदार संजय राऊत यांनी केली आहे. संकटकाळात भारताला अनेकदा इराणने मदत केली आहे, पाठीशी राहिला आहे. पाकिस्तान-भारताचा संघर्ष झाला तेव्हा इराणने भारताला पाठिंबा दिला होता अशी आठवणही संजय राऊतांनी करुन दिली आहे. ते मूकबधीर होऊ का बसले आहेत? असा प्रश्न राऊतांनी विचारला आहे.

“भारताने, नरेंद्र मोदींनी सर्वात आधी इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खमेनी यांच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला पाहिजे. ते लोकातून निवडून आलेल्या राष्ट्राभिमुख सरकारचे सर्वोच्च नेते होते. युद्धात ज्या पद्धतीने त्यांची हत्या झाली. इराण भारताला जुना पारंपारिक मित्र आहे. काश्मीरप्रश्नापासून ते संकटकाळात त्यांनी भारताला अनेकदा मदत केली आहे, पाठीशी उभा राहिला आहे. पाकिस्तान-भारताचा संघर्ष झाला तेव्हाही इराण भारताला पाठिंबा दिला आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“इराणने भारताला सर्वात स्वस्त तेल दिलं आहे. अशावेळी भारताचं कर्तव्य आहे. त्या देशाच्या सर्वोच्च नेता लीडरचं निधन झाल्यानंतर शोक व्यक्त करायला घाबरता. ट्रम्प आणि नेतान्याहू यांची परवानगी लागते का? तुम्हालाही उचललं जाईल अशी भीती वाटते का? तुम्हाला धमकावलं आहे का? तुम्ही भारताच्या मित्रांच्या शोकात सहभागी होत नसाल तर ही चिंतेची बाब आहे,” असं राऊतांनी सांगितलं.

“इराणवरील हल्ला हे सैतानी कृत्य आहे. मुलींच्या शाळेवर बॉम्बने हल्ला केला जातो. 100 कोवळ्या मुली ठार होतात याचा निषेध जगाने, मोदींनी केला पाहिजे. राष्ट्रपतींनीही निषेध केला पाहिजे. इस्त्रायलकडून 100 कोवळ्या मुली ठार होतात याचा निषेध मोदींनी केला पाहिजे. ते मूकबधीर होऊ का बसले आहेत? अशा सैतानी वृत्तीच्या राजकारण्याला मोदी मिठी मारतात आणि त्यांचं पदक गळ्यात घालून भारतात येऊन गप्प बसतात यामागे काहीतरी रहस्य आहे,” असा टोलाही त्यांनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *