ढगाळ वातावरण अन् होरपळ! घराबाहेर पडण्याआधी हवामान वृत्तावर एक नजर; उकाडा कधी वाढणार?

हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार सध्या गुजरातपासून नजीकच्या परिसरावर आणि कर्नाटकातील दक्षिण भागामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. ज्यामुळं मराठवाड्यापर्यंत या प्रणालीचे परिणाम दिसत असून, कमी दाबाचा पट्टा सक्रीय असेल असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात पुढील 24 तासांमध्ये काही जिल्ह्यांत आकाश अंशत: ढगाळ असेल तर, किनारपट्टी भागांमध्ये दमट हवामानामुळं उष्मा अधिक वाढल्याचं जाणवेल.

ढगाळ हवामानासह राज्यात उन्हाची तीव्रता आणखी वाढेल असा अंदाज असून उष्मा वाढणार असल्यामुळं अधिक होरपळ होईल असा अंदाज आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात प्रामुख्यानं विदर्भात उकाडा अधिक तीव्र होईल. तर, तापमानात सरासरी 3 ते 4 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पुढील 24 तास वातावरण कोरडं राहील, तर दुपारी उष्मा अधिक वाढणार असल्या कारणानं 11 ते 4 च्या वेळेत गरज नसल्यास घराबाहेर पडणं टाळा असं आवाहन करण्यात येत आहे. उकाड्यामध्ये काही कारणास्तव बाहरे पडणार असाल तर उन्हापासूनच बचाव करण्यासाठी काही सोपे उपाय अमलात आणा असाही सल्ला नागरिकांना देण्यात येत आहे.

पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात काय अंदाज?

पुण्यासह सातारा, सांगली आणि पश्चिम महाराष्ट्रात आशा अंशत: ढगाळ राहील तर, विदर्भात वाऱ्याचा वेग कमी झाल्यानं हवेतील गारठा कमी होणार असून, तापमानाचा आकडा 37 अंशाच्याही पुढं जाण्यची शक्यता आहे. तर, मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, बीड, परभणी आणि धाराशिवमध्ये हवामान कोरडं आणि उष्ण राहणार असल्यानं उन्हाच्या झळा आणि होरपळीपासून सुटका नाही, असंच चित्र राज्यात पाहायला मिळेल.

देशभरातील हवामानाचा अंदाज थोडक्यात… 

स्कायमेट या खासगी हवामान संस्थेच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये अंदमान आणि निकोबार बेट समूहामध्ये काही भागांत पावसाची शक्यता आहे. तर, तेलंगणा, कर्नाटकचा अंतर्गत भाग आणि केरळच्या काही भागांमध्येसुद्धा पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या पर्वतीय भागांमध्ये हलका पाऊस आणि अतीव उंचीवर तुरळक ठिकाणी हिमवृष्टीस पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसेल. मध्य भारतात मात्र पारा चढताना आढळेल. ज्यामुळं उकाड्याचं हे पर्व हळुहळू देश व्यापेल असं म्हणणं गैर नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *