साताऱ्यातील यशवंत सहकारी बँकेतील 112 कोटींच्या कथित घोटाळा प्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. कराड, सातारा आणि फलटण येथील बँकेच्या तीनही शाखांवर ईडीने छापे टाकले होते. या प्रकरणी काही दिवसांपूर्वी कराड शहर पोलीस ठाण्यात 50 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होत. या प्रकरमात आता भाजपचे नेते शेखर चरेगावकरला अटक करण्यात आली आहे.
कराडमधील बहुचर्चित आणि गाजलेल्या यशवंत बँक घोटाळा प्रकरणात अखेर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी आणि सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर याला मध्यरात्री पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गेल्या दिवसापासून फरार असलेल्या चरेगावकरला पकडण्यात पोलिसांना मोठे यश आले असून, या कारवाईमुळे सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
यशवंत बँकेत तब्बल 112 कोटी रुपयांहून अधिक रकमेची अफरातफर केल्याचा गंभीर आरोप शेखर चरेगावकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर आहे. याप्रकरणी 12 ऑक्टोबर 2025 रोजी कराड शहर पोलीस ठाण्यात सुमारे 50 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून चरेगावकर फरार होता आणि पोलीस त्याच्या मागावर होते.
दरम्यानच्या काळात, या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) देखील चरेगावकर यांच्या बंगल्यावर आणि यशवंत बँकेच्या फलटण शाखेवर छापे टाकून तपासणी केली होती.चरेगावकरचा शोध घेण्यासाठी पोलीस सातत्याने प्रयत्न करत होते. यापूर्वी पोलिसांनी त्याचा दत्तक भाऊ विठ्ठल कुलकर्णी याला अटक केली होती, मात्र चरेगावकर पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरत होता.
अखेर मंगळवारी रात्री उशिरा सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने कराडजवळील विंग गावात सापळा रचून शेखर ताब्यात घेतले.त्याला कराड येथील न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी पक्षाचा युक्तिवाद आणि प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता, न्यायालयाने शेखर चरेगावकरला सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ११२ कोटींच्या या मोठ्या आर्थिक घोटाळ्याचे धागेदोरे कोठपर्यंत पसरले आहेत आणि यात आणखी कोणाचे हात गुंतले आहेत, याचा तपास आता पोलीस कोठडीत सुरू होणार आहे. या कारवाईमुळे ठेवीदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
