सोशल मिडियावर सध्या एका 6 वर्षाच्या मुलाची फारच चर्चा होत आहे. मुंबईतील रचित पांचाळ या चिमुकल्याने एक अनोखा पराक्रम गाजवला आहे. 22 फेब्रुवारी रोजी झालेल्या ज्युनिअर मुंबई श्री 2026 स्पर्धेमध्ये 55 किलो वजन गट आणि 23 वर्षांखालील वयोगटात रचितने त्याच्या वडिलांच्या जागी भाग घेतला आणि त्याच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मंचावर 30 वर्षांहून अधिक वयाचे बॉडीबिल्टर्सही होते मात्र, मनात कोणतीही भीती न बाळगता पूर्ण आत्मविश्वासाने त्याने मंचावर प्रदर्शन केले.
वडीलांचा अपघात मात्र, मुलाने हार मानली नाही…
2024 साली रचितचे वडील उमेश पांचाळ हे सदरच्या बॉडीबिल्डींग स्पर्धेत सहभागी होणार होते. पण स्पर्धेच्या 2 दिवस आधी अंधेरी ऑफिसमधून वसईला एका क्लायंटला भेटण्यासाठी जात असताना त्यांच्या मोटारसायकलचा अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली. यानंतर पायाच्या 2 शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यातून त्यांना बरे होण्यास अनेक महिन्यांचा काळ गेला. यामुळे त्यांना ज्युनिअर मुंबई श्री 2026 स्पर्धेमध्ये भाग घेणे शक्य झाले नाही. मात्र, त्यांच्या अवघ्या 6 वर्षांच्या मुलाने हार मानली नाही. वडीलांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने प्रशिक्षण घेत, व्यायम करत या स्पर्धेत भाग घेतला.
आई-वडीलांसाठी डोळ्यात आनंदाश्रू आणणारा क्षण
रचितने या स्पर्धेत सहभागी होऊन फक्त वडीलांचे स्वप्नच पूर्ण केले नाही तर, त्याच्या आई-वडीलांना अभिमान मिळवून दिला. सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये शिकत असलेला रचित अनेक महिन्यांपासून त्याच्या वडीलांसह जिममध्ये प्रशिक्षण घेत होता. तो सायकलिंग आणि धावण्याच्या स्पर्धेतही भाग घ्यायाचा. तसेच तो विशाल परब यांच्याकडून प्रशिक्षण घेत आहे, ज्यांनी त्याच्या वडीलांनाही प्रशिक्षण दिले. एप्रिल 2025 मध्ये जेव्हा गिरगावमध्ये झालेल्या बॉडीबिल्डींग स्पर्धेत त्याने पहिल्यांदा मंचावर प्रदर्शन केले होते. हा क्षण त्याच्या आई-वडीलांसाठी डोळ्यात आनंदाश्रू आणणारा क्षण होता.
बॉडीबिल्डर्ससाठी अत्यंत मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा
ज्युनिअर मुंबई श्री बी मुंबईतील बॉडीबिल्डर्ससाठी अत्यंत मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते. जी बृहन्मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि मुंबई बॉडीबिल्डिग असोसिएशन द्वारा आयोजित केली जाते. यामध्ये 55 किलो, 60 किलो, 65 किलो, 70 किलो आणि 70 किलोवरील गट या वजनानुसार विविध गटात स्पर्धा होते. प्रत्येक गटातील विजेत्यांमध्ये पुन्हा फायनल राऊंड होतो आणि त्यातून एका विजेत्याला ज्युनिअर मुंबई श्री या किताबाने सन्मानित केले जाते. सध्या तरुणांमध्ये जिम आणि फिटनेसचे वेड वाढले आहे, ज्यामुळे या स्पर्धेला मिळणारा प्रतिसाद दरवर्षी वाढत आहे.
