आज 24 फेब्रुवारी 2026 रोजी विधानभवनात राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडत आहे. ज्यामध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले जात आहेत. अशात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या आधुनिक काळात वाढत चाललेल्या सायबर गुन्ह्यांबाबत भाष्य करत जनतेला सतर्कतेचे आवाहन केले आहे.
“डिजीटल अरेस्ट असा कोणता प्रकारच नाही” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना सामाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी डिजिटल अरेस्टबाबात सरकारसमोर प्रश्न उपस्थित केला. यापासून जनतेला वाचवण्यासाठी सरकारने या सायबर गुन्ह्यांबद्दल जनजागृती करणे, त्वरीत मदत मिळण्यासाठी स्पेशल फोर्स यांसारख्या काही प्रमुख सोई-सुविधा द्याव्या अशी मागणीही केली. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “डिजीटल अरेस्ट असा कोणता प्रकारच नाही” असं म्हणत जनतेला अशा गोष्टींना बळी न जाण्याचे आवाहन केले. ते पुढे म्हणाले, “कायद्यामध्ये कोणालाही डिजिटल अरेस्ट करता येत नाही, म्हणून जर तुम्हाला कधी असा फोन आला तर तो फ्रॉडच आहे. अशावेळी सर्वप्रथम 1930 या क्रमांकावर सायबर कक्षाला संपर्क साधा, गोल्डन हावर्समध्ये संपर्क केला तर लवकर पैसे परत मिळवणं शक्य होतं.”
डिजीटल अरेस्ट म्हणजे नेमके काय?
यावेळी त्यांनी उदाहरण देत डिजिटल अरेस्ट म्हणजे काय, हे देखील जनतेला थोडक्यात समजावले. “तुमच्या नावाने पार्सल आले आहे आणि त्यात ड्रग आहे असे सांगणारे फोन येतात , तुम्हाला सीबीआय किंवा इतर अधिका-यांच्या नावाने फोन केले जाऊन डिजीटल अरेस्ट म्हणजे स्क्रीनसमोरुन हलायचेच नाही असे सांगितले जाते. आणि नंतर पैसे मागितले जातात, लाखांची रक्कम उकळली जाते. एका रिटायर्ड आयएएस अधिकारी, नेव्हल अधिकारी हे अश्या डिजीटल अरेस्टला फसले आहे. असे पैसे काढून विदेशात ते पैसे ट्रान्सफर होतात. आयएएस, नेव्हल अधिकारी यात अडकल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली.
यंत्रणा जास्तीत जास्त वेगवान करण्याचे आश्वासन
तसेच शरद पवार राष्ट्रवादीचे नेते अभिजीत पाटील यांनी त्यांच्यासोबत घडलेला सायबर गुन्ह्यांचा प्रकार सांगितला आणि शंका उपस्थित करत ते म्हणाले, “मी स्वत: सभागृहाचा सदस्य असतांना माझ्या कारखान्याचे 1 कोटी 10 लाख पैसे ऑनलाईन फसवणूक होऊन शेकडो अकाऊंटला गेले. डिजीटल फसवणुकीत गोल्डन हावर्समध्ये तक्रार करूनही उपयोग झाला नाही. यावर मुख्यमंत्र्यांनी “काही तासांत ऑनलाईन फसवणूकीचे पैसे शेकडो खात्यात जातात, त्या खात्यांना ट्रॅक करणारी यंत्रणा आपण जास्तीत जास्त वेगवान करत आहोत” असे आश्वासन दिले.
डिजिटल अरेस्टपासून वाचण्यासाठी कोणती काळजी घ्यावी?
सर्वप्रथम सर्वांनी हे लक्षात घ्यायला हवे की, भारतीय कायद्यात डिजिटल अरेस्ट या प्रकारची कोणतीही तरतूद नसते. कोणतेही पोलीस किंवा सरकारी तपास यंत्रणा तुम्हाला व्हॉट्सअॅप किंवा व्हिडिओ कॉलवर तुम्हाला अटक करू शकत नाही. पण तुम्हाला कोणताही फ्रॉड फोन आला तर तुम्ही कोणती सतर्कता बाळगायला हवी हे जाणून घ्या.
1. जर अनोळखी क्रमांकावरून व्हिडिओ कॉल आला आणि समोर पोलीसांच्या गणवेशातील व्यक्ती दिसत असेल तर घाबरू नका.
2. अनेकदा गुन्हेगार सांगतात की तुमच्या आधार कार्डचा वापर ड्रग्जच्या तस्करीसाठी किंवा मनी लाँड्रिंगसाठी झाला आहे. अशावेळी तुमचा आधार नंबर, बँक डिटेल्स किंवा ओटीरी चुकूनही शेअर करू नका.
3. यातून सुटका करण्यासाठी पैशांची मागणी केल्यास, त्यावर कधीही विश्वास ठेवू नका.
4. भीती वाटली तर त्वरीत कॉल कट करा. कॉलदरम्यान ज्या पोलीस विभागाचे नाव घेतले आहे, त्यांच्या अधिकृत क्रमांकावर किंवा स्थानिक पोलीस स्थानकावर संपर्क साधून खात्री करा.
5. जर तुमची फसवणूक झाली असेल तर 1930 नॅशनल सायबर क्राइम हेल्पनाइन वर संपर्क साधा. तसेच www.cybercrime.gov.in या वेबसाइटवर तक्रार नोंदवा.
