सोन्या-चांदीच्या वस्तू गाळात सापडतात
गोदावरी नदीच्या तीरावर दशक्रिया विधी घाट आहे, येथे दररोज दशक्रिया विधी पार पडतात. विधीनंतर राख आणि अन्य साहित्य नदीपात्रात विसर्जित केले जाते. यामध्ये मृत व्यक्तींसोबत ठेवलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तू गाळात सापडतात. त्यामुळे अनेक जण या ठिकाणी सोने शोधतात. काहींना अंगठ्या, मंगळसूत्राचे मणी, चांदीचे दागिने अशा वस्तू सापडल्याची माहिती आहे. त्यामुळं इथले स्थानिक लोक पात्राचे पाणी कमी झाले की या वस्तू शोधण्यासाठी गर्दी करतात. तशीच गर्दी सध्या झाली आहे.
सोनं ठेवण्याची प्रथा काय?
सामान्यपणे व्यक्ती मरण पावण्याच्याआधीच मंगळसूत्र, अंगठ्या, चेन, कानातले, बांगड्या इत्यादी गोष्टी मृत्यूपूर्वीच काढून घ्यावेत आणि कुटुंबीयांकडे ठेवावेत, असं सूचवलं जातं. चितेवर दागिने ठेवले तर ते वितळून नष्ट होतात किंवा उच्च तापमानामुळे राखेत मिसळतात. शास्त्रोक्त विधीनुसार सोन्याचे छोटे तुकडे ठेवले जातात. चितेवर मृतदेह ठेवल्यानंतर, मुखाग्नी देण्यापूर्वी मृत व्यक्तीच्या पार्थिवाच्या मुखात (तोंडात) दोन्ही नाकपुड्या, दोन्ही डोळे, दोन्ही कान अशा ठिकाणी सोन्याचे छोटे तुकडे किंवा उपलब्ध नसल्यास तुपाचे थेंब आणि तुळशीपान ठेवले जाते. असं केल्यामुळे आत्म्याला शुद्धी मिळते आणि पुढील यात्रा सुलभ होते, असं गरुड पुराण व इतर ग्रंथांमध्ये म्हटलं आहे. काही ठिकाणी तोंडात सोन्याचा छोटा मणी किंवा तुळसीपत्रासोबत सोने ठेवण्याची प्रथा आहे. या प्रथांमुळेच मयत व्यक्तीची दशक्रीया विधी झाल्यानंतर त्याच्या पार्थिवाची राख जिथे विसर्जित केली जाते तिथे अशाप्रकारे सोनं शोधण्यासाठी गर्दी होते.
पैठणच्या नाथषष्ठीनिमित्ताने नाथ मंदिर परिसराच्या पाठीमागे गोदावरी नदी पात्रातील पाणी कमी करण्यात आले आहे. त्यामुळं नदीचे पात्र मोठ्या प्रमाणात उघडे पडले आहे. हीच संधी साधून सोन्या-चांदीच्या वस्तू शोधण्यासाठी शेकडो महिला, पुरुष दररोज नदीपात्रात हातात चाळण्या, टोपल्या घेऊन उतरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
