शुक्रवारी जिल्ह्यात एका भीषण अपघातामुळे खळबळ उडाली आहे. लग्नच्या आनंदादरम्यान वऱ्हाडाच्या वाहनाचाच भीषण अपघात झाल्यामुळे शोकाकुल वातावरण निर्माण झालं आहे. जळगाव जिल्ह्यातून श्रीरामपूरकडे लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोला सिल्लोड-भराडी रस्त्यावरील आंबा फाट्याजवळ हा भीषण अपघात झाला.
एका महिलेचा मृत्यू
शुक्रवारी २० फेब्रुवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास चालकाला डुलकी लागल्याने टेम्पो रस्त्या कडेला असलेल्या वीज खांबाला धडकून उलटला. या दुर्दैवी घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. रेखाबाई वसंत गोसावी रा. बोदवड यांचा मृत्यू झाला आहे. तर सविता गोसावी ४०, सरुबाई गोसावी ५०,वसंताबाई कोळी ६५, ममता कोळी ११, साहिल सपकाळ १३, पुरुषोत्तम तायडे ११, प्रमिलाबाई गोसावी ५५ हे जखमी झाले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असलेले वऱ्हाडी एका आयशर टेम्पोने क्रमांक MH-19-CX-3254 श्रीरामपूरकडे जात होते. सिल्लोड शहरापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या आंबा फाट्याजवळ चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो वीज खांबाला धडकला आणि उलटला. अपघाताच्या वेळी टेम्पोमध्ये महिला, वृद्ध आणि मुलांसह सुमारे ३० ते ३५ प्रवासी होते.
पोलिसांची सतर्कतामुळे ३५ जणांचे वाचले प्राण
ज्यावेळी अपघात झाला, त्याच वेळी पोलिसांची गस्त सुरू होती. वीज खांबाला धडक बसल्यामुळे तारा तुटून स्पार्किंग होत होती. पोलीस हवालदार रवींद्र ठाकरे, भिकन सुतके आणि यतीन कुलकर्णी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि लाकडी काठीच्या सहाय्याने विजेच्या तारा बाजूला केल्या, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि वाहनातील ३५ प्रवाशांचे प्राण वाचले.
