मुलाच्या लग्नाची तयारी रंगलेली, वरमाईवर काळाचा घाला, मुंबईतील राहत्या घरात होरपळून मृत्यू, दिव्यामुळे गादी पेटल्याची भीती

विलेपार्ले येथील एका बहुमजली इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर सोमवारी आग लागली. यात एका वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला, तर दुसरी महिला जखमी झाली आहे. या आगीमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र मुलाच्या लग्नाच्या आदल्या दिवशी घडलेल्या दुर्घटनेने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

नेमकं काय झालं?

विलेपार्ले पूर्वेला फिरोज शाह मेहता मार्गावरील ‘सुविधा पर्ल’ या १३ मजली इमारतीच्या शेवटच्या मजल्यावरील घरात सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास अचानक ही आग लागली. अग्निशमन दलाने ती लेव्हल-१ प्रकारातील घोषित करून विझविण्याचे प्रयत्न सुरू केले.

आगीवर दुपारी १२.४५ वाजताच्या सुमारास नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र, या दुर्घटनेत भावना सात्रा (६२) आणि अनेरी सात्रा (३४) या महिला जखमी झाल्या. त्यांना तत्काळ नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घरातील साहित्य भस्मसात

जखमींपैकी भावना यांचा मृत्यू झाला, तर गंभीररित्या जखमी झालेल्या अनेरी यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. या आगीमुळे फ्लॅट क्रमांक १३०१ आणि १३०२ मधील विद्युत वायर, घरगुती साहित्य, फर्निचर, कपडे, एसी आदी साहित्य भस्मसात झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कशामुळे आग पसरली?

भावना सात्रा यांचे पती रिअल इस्टेट डेव्हलपर आहेत. आगीचे नेमके कारण स्पष्ट नाही, परंतु शेजारी आणि प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, भावना यांच्या मुलाचे घटनेच्या दुसऱ्या दिवशी – मंगळवारी लग्न होते. त्यामुळे लग्नाच्या विधींसाठी देवघरात दिवा लावण्यात आला होता आणि कदाचित जवळच असलेल्या गादीने पहिल्यांदा पेट घेतल्यामुळे आग लागली असावी.

घटनेच्या वेळी दोघीच जणी घरात होत्या, तर इतर कुटुंबीय टेरेसवर लग्नाच्या विधींची तयारी करत होते. आग लागल्याचं समजताच अग्निशमन यंत्रणांना लगेच माहिती देण्यात आली. फायर ब्रिगेड तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि दोघींना बाहेर काढण्यात आलं, परंतु रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच भावना यांना मृत घोषित करण्यात आलं, तर अनेरी सहा टक्के भाजल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *